
दीपक वाघमारे । पुणे
पुण्यात हडपसर परिसरात भर वस्तीत सांबर घुसल्याने बघ्यांची एकच गर्दी उसळली. पुणे-सोलापूर आणि पुणे-सासवड मार्गाच्या मधोमध असणाऱ्या एका कालव्यामध्ये हे सांबर पहाटे पाच वाजल्यापासून फिरत अल्याने नागरिकांनी पोलीस आणि कात्रज सर्पोद्यानाचे रेस्क्यू टीमला माहिती दिली. सर्पोद्यानाचे रेस्क्यू टीमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांबराला पकडण्यासाठी डाट मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बेशुद्ध न होता सैरावैरा धावत होते. शेवटी उद्यानामधील एका मार्गावर रेस्क्यू टीम व अग्निशमन दलाने लावलेल्या नायलॉनच्या जाळीमध्ये सांबर अडकले. या सांबराला उपचारासाठी कात्रज सर्पोद्यानात नेले मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला.
भरकटलेल्या सांबराला कात्रज सर्पोद्यानाचे रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून तब्बल दोन तासानंतर जेरबंद केले. मात्र यावेळी सांबराला पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गोंधळामुळे आणि भटकी कुत्री मागे लागल्यामुळे सांबर कालव्या लगतच्या संरक्षक भिंतीला आणि उद्यानातील जाळीला जोरदार धडक देत होते. त्यामुळे सांबर जबर जखमी झाले होते. रेस्क्यू टीमचे महेश देशपांडे व त्यांच्या टीमने त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. भेदरले सांबर पकडल्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. त्यामुळे या सांबराचा मृत्यू झालेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

























































