
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. क्षीरसागर यांचा मावस भाऊ या अपघातात जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माणिकराव रायजादे हे त्यांच्या दिवंगत बहीण व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांच्या धार्मिक विधीसाठी दर महिन्याला नाशिकच्या सिन्नरहून बीडला येतात. धार्मिक विधी आटोपून ते आपला मुलगा प्रीतमसह नाशिकला परत निघाले होते. यावेळी प्रीतम गाडी चालवत होता आणि माणिकराव रायजादे बाजूच्या सीटवर बसले होते. दरम्यान अचानक गाडी डिव्हायडरला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात माणिकराव रायजादे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा प्रीतम रायजादे हा जखमी झाला आहे. प्रीतम रायजादे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
































































