काकांविरोधात बंड पुकारणारे संदीप क्षीरसागर पाडवा भेटीसाठी बारामतीला रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

राजकीय भवितव्य निश्चित करण्यासाठी आपल्या  काकांविरोधात म्हणजेच जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बंड पुकारणारे संदीप क्षीरसागर हे बारामतीला रवाना झाले आहेत. संदीप क्षीरसागर हे काकांच्या सावलीतून बाहेर येत स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपलं अस्तित्व लवकरात लवकर प्रस्थापित व्हावं यासाठी संदीप क्षीरसागर हे दिवाळी पाडव्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

राजकीय वर्चस्वासाठी क्षीरसागर कुटुंबामध्ये बंडखोरी झाली आहे. या कुटुंबामध्ये आपणच खरे राजकीय वारसदार आहोत असा दावा  संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या काकांच्या विरोधात आघाडी निर्माण करायला सुरुवात केली आहे. काकांविरोधात बंड पुकारल्यानंतर आगामी निवडणुकांत पक्षाची कृपादृष्टी राहावी यासाठी संदीप क्षीरसागर यांनी बारामतीची वाट धरली आहे. दिवाळी पाडव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमध्ये सर्वसामान्यांची भेट घेत असतात. या सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही असतात. या नेत्यांमध्ये यंदा संदीप क्षीरसागरांचाही समावेश झाला असून त्यांना पवार राजकीय आशिर्वाद देणार की नाही याकडे जयदत्त क्षीरसागर यांचं लक्ष आहे.