
संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, कत्तल केलेले 900 किलो गोमांस शहर पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून 900 किलो गोवंशमांसासह तीन तीन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हलीम युसूफ शेख (सध्या रा. भारतनगर, मूळ रा. कसारा, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
संगमनेर शहरहद्दीतील अवैध कत्तलखाने बंद करणे हा पोलिसांना डोकेदुखीचा विषय ठरला आहे. एकीकडे दरोडे, घरफोडींच्या घटनांनी त्रस्त असलेल्या पोलिसांच्या कारभाराला आता अवैध धंद्यांनीदेखील उघडे पाडले आहे. आज पहाटे संगमनेर खुर्द शिवारात एका पांढऱया रंगाच्या महिंद्रा पिकअप बोलेरो गाडीतून गोवंशमांस घेऊन जाताना आरोपीला पोलिसांनी पकडले. हवालदार सुरेश कारभारी घोलवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरमध्ये कत्तलीसाठी चाललेल्या 5 जनावरांची सुटका
कत्तलीसाठी वाहतूक केलेल्या पाच जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सलाबतपूर ते खडकाफाटा रोडवर खडका फाटा येथे सापळा लावून ही कारवाई केली. याप्रकरणी फिरोज अन्सार देशमुख (वय 34, रा. नेवासा), शोएब अलिम खाटीक (वय 20, रा. खाटीक गल्ली, नेवासा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोत तीन मोठ्या गाई व दोन लहान वासरे सापडली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी टेम्पो व गोवंशीय जनावरे नदीम सत्तार चौधरी (रा. खाटीक गल्ली, ता. नेवासा) याच्या मालकीची असल्याचे सांगितले. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































