
सांगली शहरात वाढलेली नशेखोरी आणि त्यातून घडणारे गुन्हे यांना पायबंद घालण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱयांना शोधून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील बुरुड गल्ली येथे रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना नशेच्या गोळ्या विकताना जेरबंद करण्यात आले.
त्याच्याकडून 250 गोळ्या जप्त करण्यात आल्या. अनिकेत विजय कुकडे (वय 21, रा. बुरुड गल्ली) आणि उमर सलीम महात (वय 20, रा. गवळी गल्ली, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीसह जिह्यात नशेबाजीचे प्रमाण वाढले होते. यातून अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढली होती. त्याचाच परिणाम खून, खुनाचे प्रयत्न, हाणामारी यांसारखे गुन्हे घडत होते. सदरचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक सांगलीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी विक्रम खोत आणि संतोष गळवे यांना रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत कुकडे हा बुरुड गल्ली येथे नशेच्या गोळ्या विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱयांनी बुरुड गल्लीतील शिवमुद्रा चौक येथे सापळा लावून कुकडे यास जेरबंद केले.
कुकडे आणि महात यांच्याजवळ नशेच्या गोळ्या आढळल्या. याबाबत सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, सदरच्या गोळ्या या कर्नाळ रोडवर राहणाऱया शहाबाज शेख ऊर्फ जॅग्वार यांच्याकडून खरेदी करून सलीम महात याला ज्यादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्याकडून 1 हजार 130 रुपये किमतीच्या निट्राव्हेट 10 एनआरएक्स निट्राझेपम 10 एमजीच्या दहा स्ट्रीप, 450 रुपये किमतीच्या निट्रोसून 5 एनआरएक्स निट्राझेपम गोळ्याच्या दहा स्ट्रीप आणि उमर माहित यांच्याकडील 1 हजार 200 रुपये असा एकूण 2 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांवर एनडीपीएस अंतर्गत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
दरम्यान, अटकेतील अनिकेत कुकडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, एनडीपीएस ऍक्ट व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशानदार, पोलीस कर्मचारी सुधीर गोरे, बिरोबा नरळे, संदीप पाटील, विक्रम खोत, संतोष गळवे, मच्छिंद्र बर्डे, उदय माळी, अनिल कोळेकर, सागर लवटे, सागर टिंगरे, गौतम कांबळे, राहुल जाधव, अजय बेंदरे, संकेत मगदूम यांच्या पथकाने केली.
मानवी शरीरावर आणि मेंदूवर गंभीर परिणाम
सांगली शहरात पकडण्यात आलेल्या नशेच्या गोळ्या या ड्रग्ज प्रकारात मोडतात. डॉक्टरांच्या सल्ल्याविना त्या गोळ्या घेतल्यास शरीराला आणि जीवाला अपायकारक आहे. सदरच्या गोळ्यांमुळे मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतात. जिह्यात नशेसाठी अवैधरीत्या आणि बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विकणाऱया आणि त्याचा व्यापार करणाऱयांवर यापुढे कारवाईची कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.























































