सांगली, सातारा जिल्हा बँकांसाठी भरघोस मतदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 85.31 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 2573 पैकी 2195 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आटपाडीत सर्वाधिक 99.38, तर सांगलीत सर्वांत कमी 53.21 टक्के मतदान झाले. निवडणूक चुरशीची असली तरीही मतदान शांततेत पार पडले. आमदार मोहनराव कदम, विक्रमसिंह सावंत, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्रमसिंह देशमुख, विशाल पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी (दि. 23) सकाळी आठ वाजता मतमोजणी होणार आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे 18 जागांसाठी आज मतदान झाले. जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान झाले. सोसायटी गटातील सहलीला गेलेले मतदार थेट मतदान केंद्रावर पोहोचल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, वादावादीचे प्रकार टाळत मतदान झाले. बँकेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल उभे होते. दोन्ही गटांकडून मतदार खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे.

सांगलीत सर्वांत कमी मतदान

जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर चुरस दिसत होती. मात्र, सांगली केंद्र ओस पडल्याचे जाणवत होते. या मतदान केंद्रावर 436 पैकी केवळ 232 मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर केवळ 53.21 टक्के मतदान झाले. आटपाडी केंद्रावर सर्वाधिक म्हणजे 99.38 टक्के मतदान झाले. आटपाडी केंद्रावरील 160 पैकी 159 मतदारांनी हक्क बजावला.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

बँकेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल उभे आहे. महाविकास आघाडीचे नेते व पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, पॅनेलप्रमुख दिलीपतात्या पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, दिनकर पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

साताऱ्यात 96. 33 टक्के

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज 96.33 टक्के मतदान झाले. एकूण 1964 मतदारांपैकी 1892 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मेढा येथे आमदार शशिकांत शिंदे व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या समर्थकांमधील किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित दहा जागांसाठी मतदान झाले. यामध्ये कराड, पाटण, जावली, खटाव, कोरेगाव आदी सहा सोसायटी संघातील लढती चुरशीच्या आहेत. कराड व जावलीतील लढती हायव्होल्टेज ठरल्या.

आज सकाळी 11 मतदान केंद्रांवर मतदान झाले. अज्ञातस्थळी गेलेले मतदार आलिशान गाडय़ांमधून मतदान केंद्रांवर पोहोचले. जावली सोसायटी मतदारसंघातील उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व विरोधी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या समर्थकांमध्ये मेढा येथे बाचाबाचीचा प्रकार घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड सोसायटी मतदारसंघ तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या जावलीत 100 टक्के मतदान झाले.

खटाव तालुक्यात एका प्रकरणात कोठडीत असलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मतदान काळासाठी उपस्थित राहण्याची मुभा दिली गेल्याने ते बंदोबस्तात थेट मतदान केंद्रावर दाखल झाले.