
>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक
शिवनेरीची शिवाई, राजगडाची पद्मावती, रायगडाची शिर्काई आणि प्रतापगडाची भवानी देवी या शिवकाळातील देवतांचे माहात्म्य आज जाणून घेऊया.
प्रतापगड – भवानी देवी
अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीचे मंदिर बांधण्याचे योजिले. त्यासाठी नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवून श्वेतगंडकी, त्रिशूळ गंडकी आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील उत्कृष्ट शिळा मागवून देवीची मूर्ती घडवली गेली. मूर्ती प्रथम राजगडावर आणण्यात आली, नंतर महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना प्रतापगडावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. राज्याभिषेकाच्या आधी महाराज प्रतापगडावर आले. देवीचे दर्शन घेऊन त्यांनी देवीला सवा मणाचे सुवर्णछत्र अर्पण केले. याच भवानी देवीची सेवा पुढे छत्रपतींच्या कित्येक पिढय़ा करत आहेत.
शिवनेरी – शिवाई देवी
शतकानुशतके जुलमी राजवटींच्या जाचाने महाराष्ट्र देश पिचला होता. या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी रंजली, गांजलेली रयत देवदेवतांना आणाभाका करत होती, पण या रयतेचे गाऱहाणे ऐकायला देव गाभाऱयात तरी कुठे होते. आशेचा किरण कुठेच दिसत नव्हता. अखेर या निराशेच्या गर्तेत शिवनेरी किल्ल्यावरील शिवाईदेवी सह्याद्रीच्या मदतीला धावून आली. या शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवबाचा जन्म झाला आणि एक प्रकारे दाटून आलेल्या काळोखाला भेदून शिवप्रभूंच्या रूपाने या भूमीवर अरुणोदय झाला. जिजाऊंनी शिवाई देवीला नवस केला होता, त्यामुळे पुत्र झाल्यावर जिजाऊंनी देवीच्या नावावरूनच बाळाला ‘शिवाजी’ असे नाव ठेवले. त्यांनी रयतेच्या मनातले स्वराज्य निर्माण केले.
रायगड – शिर्काई देवी
शिवपूर्व काळापासून शिर्काई देवी रायगडची गडदेवता आहे. रायगड राजधानीचा गड झाल्यावर महाराजांनीसुद्धा या देवीला गडदेवतेचा मान दिला. महाराजांच्या दरबारातील कवी भूषणने या देवीवर ‘जयतु जयतु जय आदिशक्ती…’ हे काव्य म्हटले. शिवकाळापासून रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी शिर्काई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही अबाधित आहे.
राजगड – पद्मावती देवी
छत्रपती शिवाजी महाराजांचे व जिजाऊ माँसाहेबांचे राजगडावर तब्बल 24 वर्षे वास्तव्य होते. याच राजगडाची पद्मावती देवी गडदेवता आहे. फत्तेखानाचा पाडाव, अफजलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती, सुरतेची लूट अशा अनेक पराक्रमांसाठी पद्मावती देवीचे महाराजांना शुभाशीर्वाद मिळाले असणार. आई जिजाऊंनी आग्य्राच्या कैदेतून महाराज सुखरूपपणे परत यावेत यासाठी याच देवीला अनेकदा साकडे घातले असणार. शून्यातून महाराजांनी स्वराज्य उभे केले याची ही पद्मावती देवी साक्षीदार आहे.
























































