
बीसीसीआयकडून आयपीएलसाठी समालोचकांच्या यादीतून संजय मांजरेकर यांना वगळण्यात आले होते. मात्र संजय मांजरेकर पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहे. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 27 नोव्हेंबरपासून क्रिकेट मालिका खेळविण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱया या मालिकेसाठी संजय मांजरेकर यांची समालोचकांच्या यादीमध्ये वर्णी लागली आहे. अशा प्रकारचे वृत्त एका मीडियामधून समोर आले आहे.
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मालिकेचे प्रक्षेपण हक्क सोनी पिक्चर नेटवर्ककडे आहेत. त्यांच्याकडून समालोचकांची यादी तयार करण्यात आली आहे. समालोचकांच्या पॅनेलमध्ये संजय मांजरेकर यांच्यासह सुनील गावसकर, हर्षा भोगले यांचाही समावेश करण्यात आलाय. वीरेंद्र सेहवाग याची हिंदी समालोचक म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच मायकेल क्लार्क, ग्लेन मॅग्रा व अॅण्ड्रय़ू सायमंडस् या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही समालोचनासाठी करारबद्ध करण्यात आल्याचे समजले आहे.
– स्पष्टवक्ते
संजय मांजरेकर हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान समालोचन करताना रवींद्र जाडेजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने संजय मांजरेकरांना आयपीएलच्या यादीतून वगळले. यानंतर संजय मांजरेकर यांनी माफीही मागितली. ऑस्ट्रेलियातील मालिकेचे प्रक्षेपण हक्क ‘सोनी’ वाहिनीकडे आहेत. त्यामुळे संजय मांजरेकर यांची समालोचक यादीत निवड झालीय. आता हिंदुस्थानात होणाऱया मालिकांसाठी बीसीसीआय कोणता निर्णय घेतेय हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.



























































