
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नितीन गडकरी हे स्वभावाने फटकळ असले तरी ते मनाने निर्मळ आहेत, मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे त्यांना उदंड, निरोगी, दीर्घायुष्य चिंतितो अशा शब्दात राऊत यांनी त्यांना शुक्षेच्छा दिल्या.
या देशात राष्ट्रीय स्तरावर विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या आड राजकारण न आणणारा शरद पवार यांच्यानंतर कोणी नेता असेल तर ते नितीन गडकरी आहेत या शब्दात संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले. गडकरी हे महाराष्ट्राचे असल्याचा आपल्याला अभिमान असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काय आहे, हे नितीन गडकरींनी गेल्या 7 वर्षातील कामातून दाखवून दिले असे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांचा कोल्हापूर दौरा
संजय राऊत हे तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर जात असून या दौऱ्याची आजपासून सुरूवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी बैठका, मेळावे यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहे.


























































