मिंध्यांच्या बाजूने ना जनता आहे ना निसर्ग, संजय राऊत यांची टीका

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मिंधे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांना शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याच्या घटनेवरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांसाठी एक जेवण ठेवलं होतं. मात्र मंत्रिपदावरून जेवणामध्ये मारामारी होईल अशी भीती वाटल्याने ते बहुधा त्यांनी रद्द केलं. एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरही उडू शकलं नाही. त्यांच्या बाजूने जनताही नाही आणि निसर्गही नाही.

राऊत यांनी म्हटले की, “हा औटघटकेचा कारभार सुरू आहे. 2024 ला देशात इंडियाचे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाल हा माझा प्रश्न आहे. 2024 ला खोटी प्रकरणे, खोटा तपास, दहशत याचं उत्तर सगळ्या यंत्रणांना देण्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं जाईल यावर इंडिया गटात एकमत आहे, यावेळी कोणालाही दयामाया नाही, सरकार बदलतंय. “

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, दोनवेळा निवडणुका जिंकल्यानंतरही पंतप्रधानांच्या डोक्यातून काँग्रेस पक्ष जात नाही याचा अर्थ काँग्रेस पक्ष मजबूत होत चालला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाने मोदींसमोर आव्हान उभे केले आहे, यामुळे त्यांच्या डोक्यातून काँग्रेस जात नाही. हरवलंत ना तुम्ही काँग्रेसला ? मग विसरून जा आणि तुमचे काम काय आहे ते सांगा. नेहरूंनी चुका केल्या आहे असं तुमचं म्हणणं असेल तर आता तुमचे सरकार आहे, सुधारा त्या चुका. नेहरुंच्या विरोधात आतापर्यंत जी सरकारे बनली त्यांनी मणिपूरची समस्या का सोडवली नाही ? काही झालं तरी नेहरूंवर खापर फोडता. नेहरुंपुढे तुम्ही स्वत:ला खुजे समजता त्यामुळे तुम्ही सारखे नेहरूंचे नाव घेत असता. ” नेहरुंनी हा देश घडवला. तुम्ही ते करू शकत नसल्याने ते नेहरूंवर टीका आहेत असे राऊत यांनी म्हटले.