आणीबाणीतही असे झाले नव्हते! न्यूजक्लिकच्या पत्रकारांवरील कारवाईवरून संजय राऊत यांचे टीकास्त्र

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी वेबसाईट न्यूज क्लिकच्या पत्रकारांच्या 30हून जास्त ठिकाणी छापेमारी केली. या वेबसाईटला चीनकडून फंडिंग मिळत असून तीन वर्षांत 38 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तुमच्या मनात पत्रकारांविरूद्ध असलेला राग आणि भीती या कारवाईतून दिसून आल्याचे राऊत यांनी म्हटले. जे तुमच्यासोबत नाही, तुमचे भजन करत नाही त्याला कधी चीन, कधी पाकिस्तान तर कधी आयएसआयचे कनेक्शन जोडून त्रास दिला जातो असा आरोप राऊत यांनी केला.

मुंबईमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांवर धाडी घातल्या, सकाळी 6 वाजता दिल्ली पोलीस उचलून घेऊन गेले. चीनकडून त्यांना फंडींग मिळत असल्याचा आरोप केला गेला. हे सगळं हास्यास्पद आहे. चीन पँगाँग लेकपर्यंत आत घुसला आहे. तिथे त्यांनी विमानतळे बांधली आहे. तिथे रस्ते आणि पूल बांधले जात आहेत. अरुणाचल प्रदेशावर चीनने दावा सांगितला आहे. मणिपुरातील हिंसाचार हा चीन प्रायोजित हिंसाचार आहे. मात्र याविषयी मोदी सरकारला राग येत नाही. 7-8 पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात आणि त्याचा राग आल्याने तुम्ही त्यांना चिनी हस्तक म्हणून त्यांच्यावर धाडी घालता. असे प्रकार हे आणीबाणीतही असे झाले नव्हते असे राऊत यांनी म्हटले.