
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे. केंद्राकडून राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घातला जातोय, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटीनाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणतंय किंवा एक केस बनवतं. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकतं नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्ततेवर घाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
एकेकाळी परमबीर सिंग यांच्यावर शंका उपस्थित करणारे आज त्यांचा वापर करून तोफा उडवत आहेत. परमबीर सिंग हे विरोधकांचं महत्त्वाचं शस्त्र आहे. केंद्रीय तपास यंत्रणांविषयी आमच्यात दुमत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत आहेत हा महाराष्ट्रावर घाला आहे. याबाबत शरद पवार यांचंही तेच मत आहे. मात्र एकदा तपास सुरू केल्यावर त्यांना सहकार्य करायला पाहिजे जे आम्ही करत आहोत, असं राऊत म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडल्यात का?
जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच्या बेछूट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की, विरोधाचं राजकारण करायचं आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचं. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार करायचा. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.



























































