हे शक्तिप्रदर्शन नाही, श्रद्धेचं दर्शन आहे! आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी संजय राऊत यांचं प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 15 जून रोजी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटनमंत्री व उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. हा दौरा म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शन नसून हे श्रद्धेचं प्रदर्शन आहे, असं प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे अयोध्येत दाखल झाले आहेत. या वेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. ते म्हणाले, आज आम्ही, मी स्वतः, मा. एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, अनिल तिवारी, जीवन कामत असे सगळे आम्ही इथे आलो. नवीन जागेत प्रभू श्रीरामांचं जे स्थान आहे. जिथे नवीन राम मंदिर निर्माण होतंय, त्या जागेला भेट दिली अत्यंत प्रसन्न वाटलं. 15 तारखेला आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे. त्याची तयारी करण्यासाठी मी आणि एकनाथ शिंदे इथे आलेलो आहोत. इकडल्या लोकांमध्ये आदित्य ठाकरे येत आहेत, म्हणून उत्साह आहे. 15 तारखेला लखनौपासून अयोध्येपासून तुम्हाला त्यांचं स्वागत होताना दिसेल. हे शक्तिप्रदर्शन नाही. हे श्रद्धेचं दर्शन आहे, असं प्रतिपादन राऊत यांनी केलं आहे.

ब्रजभूषण शरण यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, ब्रजभूषण शरण मोठे नेता आहेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. आम्ही त्यांना खूप वर्षांपासून ओळखतो, आमची मैत्रीही आहे. पण, इथे त्यांनी जी चळवळ उभी केली आहे, ती त्यांची भावना आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांच्या भावनांना त्यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या भावनांचा उद्रेक हा ब्रजभूषण यांच्या माध्यमातून व्यक्त झाला. असं असलं तरीही त्यांच्या चळवळीशी आमचा संबंध नाही.आम्ही सध्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी आलो आहोत. आदित्य ठाकरे या दौऱ्यावेळी श्रीरामांचं दर्शन घेतील, माध्यमांशी संवाद साधतील आणि संध्याकाळी शरयू किनारी आरतीतही सहभागी होणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

असली आ रहा है, नकली से सावधान या पोस्टरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, असली तर 15 जून रोजी अयोध्येत येत आहेत, नकली कोण मला माहीत नाही. आणि असली नकलीचा निर्णय महाराष्ट्राची जनता योग्य प्रकारे करू शकते, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.