संजय राऊत यांची नारायण राणेंना नोटीस, सोमय्यांनाही कोर्टात खेचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण पैसे खर्च केले म्हणून संजय राऊत खासदार झाले, असे विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. राणे यांच्या या वक्तव्यामुळे आपली नाहक बदनामी झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांना आपण भाजपाचे पोपटलाल समजतो; कारण मागचापुढचा विचार न करता ते फक्त पोपटासारखे बोलत राहतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. या दोघांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवून त्यांना न्यायालयात उत्तर द्यायला लावू, असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. हे लोक भन्नाट आणि बिनबुडाचे आरोप करत असतात. शिवसेना आणि शिवसेना नेत्यांबाबत काहीही विधाने करत असतात. त्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढायचे आम्ही ठरवले आहे, असे संजय राऊत या वेळी म्हणाले.

…उद्या म्हणतील बाळासाहेबांना यांनीच शिवसेनाप्रमुख केले

नारायण राणे बोलतात की, 2004मध्ये त्यांनी मला खासदार केले. मग त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते? नारायण राणे शिवसेनाप्रमुख होते का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ‘‘बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच नेमणूक केली असेच बोलायचे नारायण राणे यांनी बाकी ठेवले आहे. त्यावरून ते काहीही बोलू शकतात हे समजते,’’ असे संजय राऊत म्हणाले.

आता कोर्टातच उत्तर द्यायला लावेन

‘‘या आरोप करणाऱया लोकांची चार आण्याचीही लायकी नाही. चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा खटला दाखल केला होता. मला काही पैसे नकोत, मी मध्यमवर्गीय माणूस आहे. मी त्यांना कोर्टात खेचणार आणि त्यांना कोर्टातच उत्तर द्यायला लावणार आहे. तुमचे काही पुरावे असतील त्यांनी ते कोर्टात द्यावेत. आम्ही सत्याची बाजू सातत्याने घेतली आहे,’’ असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

मी हिंदुस्थानचा नागरिक, बांगलादेशी-पाकिस्तानी नाही

‘‘2004मध्ये मी दै. ‘सामना’चा कार्यकारी संपादक होतो. त्यापूर्वीही ‘सामना’ वृत्तपत्रातच काम करत होतो. माझी स्वतःची वैयक्तिक अशी ओळख होती. नारायण राणे म्हणतात की, माझे मतदार यादीत नावच नव्हते. पण मी 25 वर्षे मतदान करत होतो. सर्व निवडणुकांमध्ये मी मतदान केले आहे. मी काय बांगलादेशी नागरिक आहे काय? की पाकिस्तानी नागरिक आहे? मी या देशाचा नागरिक आहे. माझे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झालेले आहे. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. 2004मध्ये माझे नाव मतदार यादीमध्ये होते. त्यामुळे त्यांनी माझा उमेदवारी अर्ज जाऊन पाहावा – माझा मतदार नोंदणी क्रमांक आहे की नाही,’’ असेही संजय राऊत म्हणाले.

जाहीर माफी मागा, नाहीतर खटला भरेन

नारायण राणे यांनी जाहीर माफी मागितली नाही तर मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. किरीट सोमय्या यांच्याविरोधातही खटला दाखल करणार असून शिवसेनेच्या ज्या ज्या लोकांवर त्यांनी आरोप केले आहेत ते सगळे खटला भरणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.