नरेंद्र मोदींवर सहा वर्षांची निवडणूक बंदी घाला, संयुक्त किसान मोर्चाची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका प्रचार सभेत काँग्रेसवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काँग्रेस घुसखोरांना, अल्पसंख्यांकांना आपली संपत्ती देणार, त्यांच्या जाहीरनाम्यात अधिक मुले असणाऱ्यांना संपत्तीचे फेरवाटप करणार असे मोदींनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने देखील या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने देखील या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसेच अशा प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी मोदींना तत्काळ पंतप्रधानपदावरून हटवून त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.,

20 एप्रिल 2024 रोजी राजस्थानमधील बांसवाडा येथे झालेल्या सभेत मोदींनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत विषारी द्वेषयुक्त भाषण केले आहे. त्यांचे हे भाषँ राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर खटला चालवावा. त्यांना पंतप्रधान पदावरून हटवावे तसेच त्यांच्यावर निवडणूक लढवण्यापासून सहा वर्षांची बंदी घालावी”, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या भाषणाची सुमुटो दखल घेऊन मोदींवर कारवाई करावी अशी देखील मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.