सप्तशती, मूर्तीरहस्य आणि देवीची रूपे

>> योगेश प्रभूदेसाई

दुर्गासप्तशती म्हणजेच देवी माहात्म्य हा शाक्त संप्रदायाचा किंवा आपण साध्या भाषेत बोलायचं झालं तर देवीच्या उपासकांचा मेरुग्रंथ. देवी उपासना या ग्रंथाविना अधुरीच म्हणावी इतकं या ग्रंथाचं महत्त्व आहे. मूलतः सातशे श्लोकांनी युक्त म्हणून सप्तशती असं या ग्रंथाला नाव मिळालं.

सर्वात प्राचीन अशा मार्कंडेय पुराणांतर्गत देवी माहात्म्य येते. मार्कंडेय पुराणात जिथे सावर्णी मनूचे आख्यान संपते तिथून लगेच देवी माहात्म्य सुरू होते. ‘देवी माहात्म्य’ या मूलग्रंथाच्या तीन चरित्रनायिका त्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि कौशिकी. यातील महाकाली ही दहा हात, दहा पाय आणि दहा तोंडे असलेली अशी सांगितली आहे, तर महालक्ष्मी ही अष्टादशभुजा म्हणजेच अठरा हातांची सांगितली आहे. कौशिकी ही अष्टभुजा म्हणजेच आठ हातांची अशी सांगितली आहे. ही कौशिकीच कालांतराने महासरस्वती म्हणून ओळखली आहे.

या ग्रंथाला कवच, अर्गला, किलक, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्तिरहस्य या सहा उपांगांची जोड आहे. आज संपूर्ण देवी माहात्म्य हा ग्रंथ उपरोक्त उपांगांसहित ओळखला जातो. वास्तवात देवी माहात्म्य ग्रंथाचा मूळ गाभा पाहिला तर देवीचे वर्चस्व, देवी पराक्रम, असूरनिर्दालन आणि त्याअनुषंगाने शत्रुनाश याच दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. एकूण ग्रंथाला तत्त्वज्ञानाची जोड ही प्राधानिक रहस्यामुळे आलेली दिसते. आता आपण मूलग्रंथाचा गाभा समजावून घेऊ.

चरित्रनायिकांनुसार ग्रंथाचे तीन भाग केलेले आहेत ते असे – प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र. प्रथम चरित्राची नायिका दशभुजा, दशवत्रा महाकाली आहे. मध्यम चरित्राची नायिका अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी म्हणजेच महालक्ष्मी आहे. उत्तर चरित्राची नायिका अष्टभुजा कौशिकी म्हणजेच महासरस्वती आहे. प्रथम चरित्रामध्ये विष्णुकरवी मधू आणि कैटभ या असुरांच्या विनाशाची कथा येते. इथे महाकालीला विष्णूची योगमाया म्हणून गौरविले आहे आणि तिच्या कृपेमुळेच विष्णू निद्रेतून जागे होतात आणि असुरांचा विनाश करतात हे दाखविले आहे.

मध्यम चरित्रामध्ये अष्टादशभुजा महालक्ष्मीचे आख्यान आहे. महिषासुराला मारते म्हणून ती महिषमर्दिनी म्हणून गौरविली गेली. सर्व देवतांच्या तेजापासून हिची निर्मिती झाली त्यामुळे एकूणच ग्रंथाच्या चरित्रनायिकांमध्ये ही देवता श्रेष्ठ ठरते. तिचे अठरा हात तिचे सार्वभौमत्व आणि सशक्तपणा दाखवतात. त्याचबरोबर सर्वांचे आत्मतेज हिच्यामध्ये एकवटले असल्याने या देवतेला आत्मस्वरूपा मानले गेले हेही यातून दिसून येते.

उत्तर चरित्रामध्ये अष्टभुजा कौशिकीचे म्हणजेच महासरस्वतीचे आख्यान येते. पहिल्या दोन आख्यांनांपेक्षा हे आख्यान थोडे क्लिष्ट आणि दीर्घ आहे. वास्तविक या चरित्राची नायिका महासरस्वती असली तरी हिच्या बरोबरीने चामुंडा याही देवतेला महत्त्व दिलेले आढळते. चरित्राच्या अंती शुंभ आणि निशुंभ हे असूर हे कौशिकीने मारले, तर चरित्राच्या मध्यवर्ती चंड आणि मुंड हे असूर कालिका मारते म्हणून ती चामुंडा म्हटली जाते. ही कालिका म्हणजे पार्वती आणि त्या पार्वतीच्या शरीरकोशापासून तयार झाली ती कौशिकी. कौशिकी शरीरापासून विलग झाली म्हणून पार्वती काळी पडते आणि त्यामुळे ती कालिका म्हटली जाते. हीच कालिका पुढे चरित्रात चामुंडा होते.

या चामुंडेव्यतिरिक्त दुय्यम महत्त्वाच्या देवता म्हणजे मातृका. वास्तवात या मातृकांचे स्वतंत्र आख्यान मार्कंडेय पुराणाव्यतिरिक्त शिव, कुर्म आदी शैव पुराणांमध्ये येऊन जाते जिथे अंधकासुराचा वध करण्यासाठी मातृका शिवशंकरांना मदत करतात. अंधकासुराच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून दुसरा अंधकासूर तयार होत असे. असाच आशय उत्तर चरित्रामध्येही येतो जिथे रक्तबीज राक्षसाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून दुसरा राक्षस तयार होत असे. हे रक्त चामुंडेने प्राशन केले आणि सर्व मातृकांनी मिळून रक्तबीजाला मारले. काही ठिकाणी या मातृकांची संख्या सात, आठ तर कधी चौसष्ठ अशी सांगितली आहे.

देवीमाहात्म्यानुसार मातृकांची संख्या आठ सांगितली असली तरी प्रत्यक्ष शिल्पांकनामध्ये यांची संख्या सातच दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे सप्तमातृका असेच नाव प्रचलित आहे. आठ मातृकांची नावे पुढीलप्रमाणे – ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री किंवा ऐंद्री, चामुंडा आणि नारसिंही. शिल्पपटांमध्ये मात्र नारसिंही क्वचितच दिसते. या मातृकांचे वैशिष्टय़ म्हणजे या पुरुष देवतांचीच स्त्रीरूपे आहेत आणि त्यामुळे ज्या-त्या पुरुष देवतांची आयुधे आणि वाहनेच या मातृकांना बहाल केली आहेत. ब्रह्माची ब्राह्मी, महेशाची माहेश्वरी, कुमारस्पंदाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, इंद्राची माहेंद्री/ऐंद्री, नरसिंहाची नारसिंही.

एकंदर उत्तर चरित्र पाहिले की शाक्त संप्रदायाचा वाढता प्रभाव सहज जाणवतो. देवी उपासना आता जास्तीत जास्त क्लिष्ट होऊ लागल्याचे दिसून येते. देवी उपासनेला तंत्राची जोड आधीपासूनच होती. कालांतराने तत्त्वज्ञानाचीही जोड मिळाल्याने देवी उपासनेमधून सर्व प्रकारची सुखे आणि त्याचबरोबर मोक्ष या दोन्ही संकल्पना पुढे येऊ लागल्या. देवी अनुष्ठानामधून मिळणाऱया उपरोक्त दोन्ही गोष्टी या देवीमाहात्म्याचा गाभा आहेत. संपूर्ण देवीमाहात्म्यातील कथानकांनुसार हेच निदर्शनाला येतं की, देवीची आराधना ही शत्रुनाशासाठी, उच्च पदासाठी, विपुलतेसाठी, मोक्षासाठी सांगितली आहे.

देवीमाहात्म्याच्या शेवटी असणाऱया रहस्यत्रयींमध्ये महत्त्वाचे रहस्य म्हणजे प्राधानिक रहस्य. या प्राधानिक रहस्याची नायिका ही मूलमाया महालक्ष्मी सांगितली आहे, पण प्राधानिक महालक्ष्मी ही अष्टादशभुजा नसून चतुर्भुज आहे. तिने हातात महाळुंग, गदा, ढाल आणि पानपात्र धारण केलेले आहेत. तिच्या मस्तकावर लिंग-योनी आणि त्याभोवती नाग धारण केलेले आहेत. अशी महालक्ष्मी ही परब्रह्मस्वरूप मानली आहे. कारण प्राधानिक रहस्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की, सर्व काही शून्य बघून महालक्ष्मीने आपल्या तेजाने ते परिपूर्ण केले. तिने आपल्यापासून चतुर्भुज महाकाली आणि चतुर्भुज महासरस्वती निर्माण केल्या. पुढे या तिन्ही देवतांनी एक स्त्रीपुरुष देवता जोड निर्माण केले आणि परस्परांत संबंध प्रस्थापित करून सृष्टीचे चक्र अविरत सुरू ठेवले.

वैकृतिक रहस्य हे नावानुसार मूल प्रकृतीच्या विकृतींचं म्हणजेच सगुणसाकार स्वरूपांचं वर्णन करणारं रहस्य आहे. यामध्ये पुन्हा दशभुजा, अष्टादशभुजा आणि अष्टभुजा देव्यांचं वर्णन येतं. त्यांचं पूजाविधानही विदित केलेलं आढळतं. मूर्तिरहस्यामध्ये देवीच्या विविध स्वरूपांची माहिती सांगितली आहे. या विविध स्वरूपांवरूनही हा अंदाज बांधता येतो की, मूर्तिरहस्याची रचना होईपर्यंत शाक्तसंप्रदाय खूपच मोठा झाला होता आणि सर्वसमावेशकही बनला होता. मूर्तिरहस्यामध्ये सांगितलेली काही स्वरूपं जशी, भीमा, रक्तदंतिका, शाकंभरी इ. मूलपाठाच्या नारायणीस्तुती अध्यायामध्येही येऊन जातात. त्यामुळे हाच अध्याय आधार घेऊन मूर्तिरहस्याची रचना झाली असावी.

एकंदर पाहता असं लक्षात येतं की, मूलसंहिता अथवा सप्तशती हे पठणासाठी असून वैकृतिक रहस्य हे तंत्रविधान उद्धृत करते. प्राधानिक रहस्य हे तत्त्वज्ञान विशद करते तर मूर्तिरहस्य देवीचे व्यापकत्व दाखवते. त्यामुळे वैकृतिक रहस्य हे केंद्रस्थानी राहून मूलसंहिता, कवच, अर्गला आणि किलक ही तंत्रविधानाची अंगे आहेत. अशा प्रकारे देवीमाहात्म्य हा स्वतः एक परिपूर्ण ग्रंथ असून शाक्तांमध्ये असलेले त्याचे महत्त्व आता सहजगत्या समजून येते.

[email protected]
(लेखक पुरातत्व व प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या