
सैन्यदलाचा बनावट गणवेश ओळखपत्र वापरून माण-खटाव तालुक्यातील युवकांना सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱया तोतया सैन्य अधिकाऱयास स्थानिक गुन्हे शाखा तसेच मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमांडच्या अधिकाऱयांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. या तोतयाने 15 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
खंडाळा तालुक्यातील कानवडी येथील एक इसम सैन्यदलाचा गणवेश घालून तसेच बनावट ओळखपत्र दाखवून सैन्यदलाचा अधिकारी असल्याचे भासवत माण व खटाव तालुक्यातील अनेक युवकांना सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमानला प्राप्त झाली होती. त्यांनी ही माहिती सातारा जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांना दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमांडसोबत संयुक्त कारवाई करून संबंधित आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले.
या पथकाने याबाबत माहिती घेतल्यानंतर माण-खटावमधील फसवणूक झालेल्या काही युवकांची नावे पुढे आली. त्यांना याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सचिन सुभाष खरात (रा. शिंदी बुद्रूक, ता. माण), मनीषा मनोज निकाळजे (रा. डांबेवाडी, ता. खटाव) व अप्पासाहेब भिकू जानकर (रा. शिंगाडवाडी, ता. खटाव) यांनी अनुक्रमे दहीवडी व वडूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या तिघांची या तोतयाने 15 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
या दरम्यान हा तोतया त्याच्या गावात आल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यांनी तत्काळ तिकडे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आपण सैन्यदलाचा बनावट गणवेश, ओळखपत्र आदी वापरून अधिकारी असल्याचे भासवून सैन्यभरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची कबुली त्याने दिली.
नोकरी लागण्यापूर्वी साडेचार लाख अन् लागल्यानंतर साडेचार लाख
याच पद्धतीने आणखी अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्याबाबत तक्रारी दाखल होतील त्याप्रमाणे फसवणुकीतील रक्कम वाढत जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सांगितले. नोकरी लागण्यापूर्वी साडेचार लाख आणि नोकरी लागल्यानंतर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून आरोपीने फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. अशाच पद्धतीने ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.




























































