
जिल्हा पोलीस दलाने दि. 26 ते 27 नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण जिह्यात ‘ऑल आउट’ ऑपरेशन राबवून 70हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. तर, चार फरारी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या आदेशानुसार एकाचवेळी ही धडक मोहीम राबविण्यात आली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाढत्या गुह्यांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सलग दोन दिवस ‘ऑल आउट ऑपरेशन’ राबविले. या ऑपरेशनमध्ये 51 पोलीस अधिकारी, 245 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता. या ऑपरेशनदरम्यान रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणाऱया चार हॉटेलचालकांवरही कारवाई करण्यात आली. तसेच, गेल्या अनेक महिन्यांपासून फरारी असलेल्या चार आरोपींना पकडण्यातही पोलिसांना यश आले. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांनी 1 हजार 294 वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये दहा वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
सीएमआयएस ऍपद्वारे एकूण 52 सराईत गुन्हेगारांना तपासण्यात आले. तसेच, माहीतगार 32 गुन्हेगार, अट्टल 2 गुन्हेगार आणि शस्त्र बाळगणाऱया 46 आरोपींचीही झाडाझडती घेतली. त्याचबरोबर रात्री एटीएम सेंटरवर चोरी होऊ नये म्हणून 262 एटीएम सेंटरमधील सुरक्षिततेची तपासणी केली. मालमत्तेच्या गुह्यांना प्रतिबंधनासाठी प्रभावी नाकाबंदी, रात्रगस्त, ऑल आउट ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिला आहे.





























































