
सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात बुधवार नाका परिसरात सापळा रचून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा प्रचंड साठा पकडला. यामध्ये पानमसाल्याची 26 पोती, रॉयल तंबाखू 717ची 13 पोती व बोलेरो जीप असा एकूण 10 लाख 52 हजार 60 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा शहरात बुधवार पेठेतील त्याच्या राहत्या घरी बोलेरो पिकअपमधून ‘हिरा गुटख्या’ची पोती एक इसम विक्रीकरिता आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. माहितीची खात्री करून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाला कारवाई करण्याची सूचना दिली होती.
त्यानुसार या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावला असताना, रविवारी (दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास संबंधित इसम बोलेरो घेऊन बुधवार नाका येथील राहत्या घरासमोर आला असता, पोलीस पथकाने त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून ‘हिरा’ पानमसाल्याची 26 पोती, रॉयल तंबाखू 717ची 13 पोती व बोलेरो जीप असा एकूण 10 लाख 52 हजार 60 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
हा माल महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून, शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 2 एप्रिल रोजी सातारा शहर व सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्या एकूण आठजणांवर कारवाई करून 24 हजार 706 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, सहायक फौजदार ज्योतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


























































