
जिममध्ये आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिम ट्रेनर रामसिंग याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर रामसिंग पसार झाला होता. पोलीसही त्याचा कसून शोध घेत होते. या दरम्यानच शहर पोलिसांनी त्यास डी-मार्टलगतच्या हायप्रोफाईल सोसायटीमधून अटक केली.
शहरातील एका जिममध्ये रामसिंग हा ट्रेनर आहे. त्या जिममध्ये एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी व्यायामासाठी जात होती. 2 मे रोजी सकाळी 10 वाजता संबंधित पीडित मुलगी जिमला गेली होती. त्यावेळी जिम ट्रेनर रामसिंग याने पीडितेला ऑफिसमध्ये बोलावून घेऊन ‘तुझे फॅट्स वाढलेले आहेत’, असे बोलून चुकीचा स्पर्श केला, तसेच पीडितेला चेंजिंगरूमपर्यंत ढकलत नेले. त्यानंतर पीडित मुलीने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी रामसिंगवर विनयभंग व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी फिल्डिंग लावली. मात्र, तो पसार झाला होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे त्याच्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. गेल्या चार दिवसांपासून पसार असलेला रामसिंग हा मुंबईत गेला होता. शनिवारी पहाटे तो डी-मार्टलगतच्या हायप्रोफाईल सोसायटीत आल्याचे समजताच पोलिसांनी तेथून त्याला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, याबाबत शहरवासीयांमध्ये संतापाची लाट आहे. मध्यंतरी कॅफेमध्येही चुकीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले होते. आता तर जिम ट्रेनरविरोधात तक्रार आल्याने असे प्रकार हळूहळू बाहेर येण्याची शक्यता वाढली आहे.


























































