मी यापुढे अपक्ष आमदारच राहणार, सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केली भूमिका

विधान परिषद निवडणुकीत मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. मला सुमारे शंभर विविध संघटनांचा, तसेच शिक्षक भारती, भाजपसह सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने मी मोठय़ा मताधिक्याने विजयी झालो. त्यामुळे मी यापुढे अपक्ष आमदारच राहणार आणि बेरोजगार, शिक्षक, सरकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले सत्यजित तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. कॉँग्रेसच्या उमेदवारीवरून घडलेल्या गोंधळाबाबत बोलताना सत्यजित यांनी या प्रकरणात कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणून मला पक्षाबाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. त्यामुळेच दोन चुकीचे एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आले. ते लक्षात आणून दिल्यावरही कॉँग्रेसकडून आपल्याला अधिकृत उमेदवारी देण्यात आली नसल्याचे सांगत त्यांनी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खळबळजनक आरोप केले तसेच आपण कॉँग्रेस पक्ष सोडलेला नसल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

काँग्रेसकडून देण्यात आलेले एबी फॉर्म चुकीचे

नाशिक पदवीधरसाठी कॉँग्रेसकडून बंद पाकिटात दोन एबी फॉर्म देण्यात आले होते. कोणाचाही भरा, असे नाना पटोले यांनी फोनवरून वडील सुधीर तांबे यांना सांगितले. ते फॉर्म घेण्यासाठी नागपूरला गेलेला माणूस 11 तारखेला ते पाकीट घेऊन पोहोचला. पाकीट उघडल्यानंतर कळले की दिलेले एबी फॉर्म हे चुकीचे आहेत. त्यात एक संभाजीनगर, तर दुसरा नागपूर शिक्षक मतदारसंघाचा होता. लागलीच ही माहिती आम्ही वरिष्ठांना कळविली. दुसऱया दिवशी 12 जानेवारीला कॉँग्रेसकडून उमेदवार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा झाली आणि एबी फॉर्म आला. त्यामध्ये पर्यायी उमेदवारांच्या कॉलममध्ये नील असे लिहिण्यात आले होते. म्हणजेच त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही हा अर्ज भरू शकत नव्हते. म्हणजेच मला उमेदवारी टाळण्यात आली होती, प्रभारी एच.के.पाटील यांनी उमेदवारी मागूनही मला संधी दिली नाही, असे सत्यजित तांबे म्हणाले.