
कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरालगत झाडांना लागलेली आग अभिनेते सयाजी शिंदे यांनी मित्रांसह विझविली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. कात्रज नवीन बोगद्यालगत दोन्ही बाजूंनी डोंगर परिसर असून त्याठिकाणी झाडे आहेत. रविवारी अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी कात्रज बोगद्याजवळ टेकडीवरील झाडांना आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे अभिनेते शिंदे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग विझविण्यात त्यांना यश आले.
आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना नव्हती. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यासंदर्भात अग्निशामन दलाला याबाबत विचारले असता त्यांनी आगीचा कॉल आला नसल्याचे सांगितले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी आग विझविल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.































































