स्टेट बँकेचे इंटरनेट बँकिंग ठप्प; ‘योनो’ सेवाही रखडल्याने व्यवहारांना फटका

96
sbi-poster

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असणाऱ्या एसबीआय म्हणजे भारतीय स्टेट बँकेची इंटरनेट सेवा सोमवारी सकाळपासून खंडित झाली आहे. त्यामुळे खातेदारांचे हाल होत आहेत. तसेच बँकेने गाजावाजा करत आणलेले ‘योनो’ अॅपही ठप्प झाल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार रखडल्याने खातेदरांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक खातेदारांनी याबाबत बँकेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, संध्याकाळपर्यंत सेवा पूर्ववत झाली नव्हती. याबाबत अनेक खातेधारकांनी सोशल मिडीयावरही नाराजी व्यक्त केली आहे.

स्टेट बँकेचे अनेक खातेदार ऑनलाईन व्यवहार करतात. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी इंटरनेट आणि योनो अॅपद्वारे व्यवहार करणे सुलभ असते. मात्र, सोमवारी सकाळपासून बँकेची ऑनलाईन सेवा बंद पडल्याने अनेकांना फटका बसला. बँकेच्या अनेक शाखातील व्यवहारही इंटरनेट सेवेअभावी ठप्प होते. तर बँकेचे योनो अॅपही ठप्प होते. अनेकांनी बँकेकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर यावर काम सुरू असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. मात्र, संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवा ठप्पच होती. त्यामुळे अनेकांचे दिवसभरातील आर्थिक व्यवहार रखडले होते.

इंटरनेट बँकेचे वेबपेज ओपनच होत नव्हते. तर योनो अॅपला अक्सेस मिळत नव्हता. अनेकांनी पुन्हा पुन्हा लॉग इन केले. मात्र, प्रतीक्षा करा असे दिसत होते. तसेच इंटरनेट बँकिंग करताना वेबपेज उघडले तर लोडिंग सुरू असल्याचे दिसत होते. याबाबत अनेक खातेधारकांनी बँकेच्या ट्विटर अंकाऊटवर तक्रारी नोंदवल्या. त्यामुळे बँकेचे ट्विटर अंकाऊट तक्रारींनी भरल्याचे दिसत होते. बँकेची इंटरनेट सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या