लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नियमबाह्य कारभार, विभागीय सहनिबंधकाकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा नियमबाह्य कारभार उघडकीस आला आहे. पात्रताच नसताना लिपिकाला व्यवस्थापक, सरव्यवस्थापक बनवण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मातोश्री महिला दूध उत्पादक सहकारी संस्थेचे सतीष शेषेराव जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 1985 मध्ये लिपिक पदावर एच.जे. जाधव हे रुजू झाले. 1987 मध्ये लोकनियुक्त संचालक मंडळाने लिपीक, सेवक भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला. एच.जे. जाधव यांना 1989 साली बँकींग ऑफीसर या पदावर बेकायदेशीर पदोन्नती देण्यात आली. तर 2004 मध्ये सहाय्यक व्यवस्थापक या पदावरून व्यवस्थापक या पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र ते या पदासाठी पात्र आहेत का याची पाहणीच करण्यात आली नाही. दोन वर्षामध्ये जीडीसी अ‍ॅण्ड ए ही परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे फक्त कळवण्यात आलेले होते. परंतु त्यांनी ती परिक्षा उत्तीर्ण झाली किंवा नाही याची शहानिशाच कोणी केली नाही.

ऑक्टोबर 2006 पासून मार्च 2019 पर्यंतचे त्यांना देण्यात आलेले आर्थिक लाभ, पगार, भत्ते, वाहन सेवा, टेलीफोन बील, मोबाईल बील, प्रवास खर्च, जादा घेतलेले इतर लाभ त्यांच्याकडून वसूल करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या संचालक मंडळावरही कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक यांनी या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात तात्काळ खुलासा करण्याचे आदेश बजावलेले आहेत. पात्रता नसताना संचालक मंडळाने पदोन्नती कशी दिली, त्यांनी आपली पात्रता नसताना पदभार कसा स्विकारला याचीच चर्चा आता होत आहे. या संदर्भात काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.