
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे काही दिवसांपूर्वी शासनाच्या नियमानुसार निर्लेखन करण्यात आले. जवळपास 50 वर्षांपूर्वीची शाळाइमारत जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, नवीन इमारत उभी करण्यात न आल्याने गावातील तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.
50 वर्षांपूर्वीची आठ खोल्यांची शाळा सप्टेंबर महिन्यात जमीनदोस्त करण्यात आली. ही शाळा भक्कम पायाभरणीत मजबूत होती. मात्र, निर्लेखनमध्ये शाळा शासनाच्या नियमानुसार पडण्यात आली. आता नवीन इमारत मिळणार असून, जवळपास पाच एकर जागेवर ही शाळा उभी राहणार आहे.
चौथीच्या वर्गाची अवस्था फार बिकट आहे. गावातील वाढणे सभागृहात या मुलांची पर्यायी व्यवस्था केलेली आहे. मात्र, सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यात हे सभागृह पूर्णपणे गळते. शिवाय या सभागृहाला खिडक्यांना झडपादेखील नाहीत. दिवसभरात येणारा पाऊस मुलांच्या अंगावर येतो. त्यामुळे मुलांच्या खाली सगळे पाणी साचते. सभागृहाची परिस्थितीदेखील चांगली नाही. स्लॅबचे बाहेरील सिमेंटदेखील निखळून पडले आहे. काही अनुसूचित प्रकार घडू नये, त्याकरिता कमीत कमी या वर्गाची पर्यायी व्यवस्था दुसरीकडे करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळेला तीन खोल्या मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शाळेला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
अडचणींचा सामना करीत विद्यार्थी गिरविताहेत धडे
शाळेतील पटावरदेखील मोठा परिणाम दिसून आला आहे. या शाळेत जवळपास पहिली ते चौथीमध्ये 283 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांची गैरसोय होत असल्याने 17 मुले ही शाळा सोडून दुसऱया शाळेत गेली. विविध तीन ठिकाणी मुलांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. पण त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी जागा, पाण्याची व्यवस्था, मुलांना शौचालयासाठीही जागा नाही. अशा अडचणींचा समाना करीत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. पोषण आहार घेण्यासाठीही मुलांना शाळेच्या मुख्य ठिकाणी यावे लागत आहे.

























































