
मुंबईत वाढत्या उकाडय़ाने त्वचाविकार वाढल्याचे समोर आले आहे. यामध्ये अंगावर पुरळ, लाल चट्टे, खाज अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विषाणूजन्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये सर्वाधिक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढत असल्याने त्वचाविकाराची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
त्वचेचा संसर्ग स्टॅफिलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस प्रकारच्या विषाणूंमुळे हे आजार वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. नाकातोंडाच्या बाजूला येणारा पुरळ नंतर वाढत जाऊन तोंडाच्या आतील भागामध्ये पुरळ येतो. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱया उकाडय़ामुळे या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डासांच्या चाव्यामुळेदेखील हा आजार बळावू शकतो. संसर्ग वाढल्यानंतर त्वचेवर चट्टे, पू असलेले फोड येऊन ते अधिकाधिक लाल होऊ शकतात. यामध्ये त्वचेची खाज वाढते. हे आजार टाळण्यासाठी सकस आहार घेणे, शक्यतो उन्हात जाताना काळजी घेणे, स्वच्छता राखणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
अशी घ्या काळजी
– स्वच्छता राखा, लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करा
– लक्षणे दिसल्यास संबंधितासाठी कपडे, टॉवेल वेगळा वापरा
– सकस आहार घ्या, नैसर्गिक थंड पेये घ्या
– शक्यतो रस्त्यावरील, उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळा



























































