
भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी या संस्थेने व्यवसायांची माहिती देणाऱ्या वाहिन्यांवर दिसणाऱ्या 15 आर्थिक सल्लागार तज्ज्ञांवर बंदीची कारवाई केली आहे. तसंच, त्यांच्याकडून कोट्यवधींची नुकसान भरपाई वसूल करण्याचे अंतरिम आदेशही दिले आहेत.
सेबीच्या म्हणण्यानुसार, बेकायदेशीर ट्रेडिंग प्रकरणात या पंधरा तज्ज्ञांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील काही जण थेट ट्रेडिंगमध्ये सहभागी होते. तसंच, काहींना पुढील आदेशांपर्यंत ट्रेडिंग करण्यापासून रोखण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत.
तसंच, या तज्ज्ञांवर 7.41 कोटींची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. या तज्ज्ञांमध्ये निर्मल कुमार सोनी, पार्थ सारथी धर, SAAR कमोडिटीज प्रायवेट लिमिटेड, मनन शेयरकॉम प्रायवेट लिमिटेड, कन्ह्या ट्रेडिंग कंपनी, नितिन छलानी, रूपेश कुमार माटोलिया, अजयकुमार रमाकांत शर्मा, एसएएआर सिक्युरिटीज इंडिया प्रायवेट लिमिटेड, रामावतार लालचंद चोटिया, किरण जाधव, आशीष केळकर, मुदित गोयल, हिमांशु गुप्ता, सिमी भौमिक यांचा समावेश आहे.

























































