कर्नाटकात पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक, रोड शो वेळी अज्ञात थेट मोदींजवळ पोहोचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-karnataka

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक राहिल्याचं उदाहरण समोर आलं आहे. कर्नाटक दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रोड शो करत होते. यादरम्यान अचानक एक तरुण धावत त्यांच्या जवळ पोहोचला. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला पकडले. मात्र, ही घटना पंतप्रधानांच्या सुरक्षेतील मोठी कुचराई असल्याचे बोलले जात आहे.

हा अज्ञात तरुण रोड शो वेळी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याच्या हातात हार होता. पंतप्रधान मोदी गाडीच्या दरवाजात उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. इतक्यात हा तरुण कुणाच्याही न कळत धावत आला आणि त्याने मोदींना हार घालण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला अगदी शेवटच्या क्षणी अडवलं आणि त्याच्या हातातील हार खेचून घेतला आणि त्याला तातडीनं बाजूला केलं. मोदींनी तो हार हातात घेऊन पुन्हा सुरक्षा रक्षकांना दिला.

मात्र, अशा प्रकारे अज्ञात व्यक्ती पंतप्रधानांजवळ पोहोचलाच कसा? ही पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील मोठी चूक असल्याचं सांगितलं जात आहे.