पोलिसांनी चूक कबूल केली, संजय राऊत यांच्याविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली म्हणून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध यवतमाळच्या उमरखेड पोलिसांनी दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा सोमवारी मागे घेण्यात आला. पोलिसांनी न्यायालयात लेखी उत्तर सादर करीत आपली चूक कबूल केली आणि एफआयआरमधून देशद्रोहाचे कलम 124(अ) वगळल्याचे न्यायालयाला कळवले.

दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकात्मक लेखन केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 124(अ) अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने या कलमाला स्थगिती दिली असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशद्रोहाचे कलम वापरले, असा आक्षेप नोंदवत संजय राऊत यांच्यातर्फे अॅड. फैझान मिर्झा, अॅड. ताज मालनस आणि अॅड. सलीम मेमन यांनी पुसद येथील   अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी ते उत्तर सादर करताना उमरखेड पोलिसांनी न्यायालयात आपल्या चुकीची सपशेल कबुली दिली. याचवेळी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतल्याचे न्यायालयाला लेखी उत्तराद्वारे कळवले.

कुणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला होता, याची चौकशी व्हावी!

सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी भादंवि कलम 124(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास मनाई करीत आदेश दिला होता. न्यायालयाचा स्पष्ट मनाई आदेश असताना उमरखेड पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अॅड. फैझान मिर्झा यांनी दिली.