तुझे परत तुजपाशी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही म्हणतात. मुंबईतील सहा समुद्रकिनाऱ्यांवर भरतीबरोबर बाहेर फेकला जाणारा कचरा बघून याची खात्री पटते. निर्माल्य, प्लॅस्टिक, थर्माकोल, रॅपर असा मुंबईकरांनी नाल्यात, ट्रकवर, गटारात टाकलेला सगळा कचरा पावसाळ्यात चौपाटय़ांवर आणि बँड स्टँडवर भरतीच्या लाटांबरोबर पुन्हा शहरातच फेकून समुद्र आपला हिशेब चुकता करतोय. हा कचरा उचलताना पालिकेच्या सफाई कामगारांची मात्र दमछाक होतेय.

मुंबईला तिन्ही बाजूंनी सागराने वेढले आहे. पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रामुळे मुंबईला चौपाटी लाभली आहे. त्यामुळे पर्यटक मुंबईकडे आकर्षित होतात. मात्र याच समुद्रकिनाऱ्यावर अनेक प्रकारचे धार्मिक विधी, सण साजरे होत असतात. त्यामुळे समुद्रात मोठय़ा प्रमाणावर कचरा फेकला जात असतो. तसेच समुद्राच्या भरतीओहोटीमुळे समुद्रातील तरंगते पदार्थ, प्लॅस्टिक हा कचरा मोठय़ा प्रमाणावर किनाऱ्यावर फेकला जात असतो. समुद्रात टाकलेला कचरा भरतीच्या लाटांमधून पुन्हा किनारपट्टीवर येत असल्याने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. पावसाळ्यात मात्र भरतीच्या लाटांची उंची खूप जास्त असल्यामुळे हा सगळा कचरा किनाऱ्यावरच नाही तर चक्क रस्त्यांवर येतोय. समुद्रावर लाटा झेलण्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या मुंबईकरांवरच हा कचरा फेकून समुद्र तुमचा कचरा तुम्हालाच परत करत आहे.

दिवसातून तीनदा स्वच्छता

मरीन ड्राइव्हवर पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात भरतीचे पाणी आणि कचरा रस्त्यावर आणि फुटपाथवर फेकला जातोय. दिवसातून दोनदा भरती येत असल्यामुळे दोनदा येथील स्वच्छता केली जात आहे. समुद्राला ओहोटी येताच पालिकेचे ३० सफाई कामगार हा कचरा उचलून स्वच्छता ठेवत असल्याची माहिती ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

– समुद्रकिनाऱ्यांवरून दररोज साधारण २० मेट्रिक टन कचरा उचलला जातो, मात्र पावसाळ्यात हेच प्रमाण चार ते पाचपट जास्त असते.