
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केबल टीव्ही, डीटीएचसाठी नवीन दर आणि नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. ‘ट्राय’ने सर्व स्थानिक केबल ऑपरेटर्सना 29 डिसेंबरपर्यंत नवीन नियम लागू करण्यास सांगितले होते, मात्र आता ‘ट्राय’ने ग्राहकांना आपल्या आवडीची चॅनेल्स निवडण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
‘ट्राय’च्या वतीने गुरुवारी ब्रॉडकास्टर्स, डीटीएच ऑपरेटर्स आणि मल्टी सिस्टम ऑपरेटर्ससोबत बैठक घेण्यात आल्याची माहिती ‘ट्राय’चे सचिव एस. के. गुप्ता यांनी दिली.
स्क्रीनवर दिसणार दर
सर्व चॅनेल्सचे दर टीव्ही स्क्रीनवर दिसणार आहेत. या दरांपेक्षा अधिक पैसे कुठल्याही केबल ऑपरेटर किंवा डिस्ट्रिब्युटर ब्रॉडकास्टरला घेता येणार नाहीत. ग्राहकांना दर महिन्याला 100 चॅनेलससाठी जास्तीत जास्त 130 रुपये आकारण्यात येतील. 100 हून अधिक चॅनेल्स पाहायचे असतील तर अतिरिक्त 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.




























































