
>> डॉ. पवन सोनार
सेल्फी… स्वतःच्या मोबाईलने स्वतःचाच फोटो काढणं… एका मर्यादेपर्यंत एक मजेशीर गोष्ट. पण सतत सेल्फी काढण्याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ते व्यसन ठरतं. रस्त्याने नाचत सेल्फी काढणं, एकाकी, उंच सुळक्यावर सेल्फी काढणं, एखादं विचित्र धाडस करून सेल्फी काढणं… या सगळ्यात नुकसान फक्त सेल्फी काढणाऱ्याचेच होते. काय असते सेल्फी काढण्यामागची मानसिकता
आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असतो. म्हणून आपल्या मोबाईलने इतरांचे फोटो काढण्यापेक्षा काहीजण स्वतःचेच फोटो घेत राहातात. सेल्फी म्हणतात ते हेच… इतरांहून काहीतरी वेगळं करतानाचे क्षण टिपण्याचं मग या लोकांना वेडच लागते. पण याला केवळ वेड म्हणता येणार नाही, तर ती एक प्रकारची मानसिक विकृतीच आहे. ही विकृती विकोपाला जाण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. काहीजणांच्या स्वभावातच ही मानसिक विकृती असू शकते. या प्रकारच्या विकृतीला आजाराचं नाव वगैरे देण्यात आलेले नाही, पण ही विकृती असते हे मात्र नक्की.
सेल्फी काढण्याची सवय असते अशा लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. ते स्वतःला कमी समजत असतात. काहीजण स्वतःला खूप जास्त चांगलं, सुंदर वगैरे समजत असतात. आपण खूप हिंमतवान आहोत असं त्यांना वाटतं. त्यांना शोऑफ करायची भारी आवड असते. असे दोन तीन प्रकारचे लोकच सेल्फी जास्त काढताना दिसतात. या लोकांना आतमधून नैराश्य किंवा उदासीनता असते. त्यामुळे ते सेल्फी काढण्यातच आनंद मानत असतात. या लोकांना नेहमी वाटतं की दुस्रयांनी आपली तारीफ करावी. आपल्या फोटोंना जास्त लाइक्स मिळावेत. मित्र मैत्रिणींनी इन्स्टाग्रामवर वा व्हॉट्सऍपवर फोटो टाकले, मग आपण टाकले नाहीत तर ते काय म्हणतील, असाही विचार या तरूण तरूणींमध्ये येतो. आपणही मागे राहाता कामा नये असं त्यांना वाटतं. मग त्यांना सेल्फीची सवयच जडते. एखाद्या फोटोला भरपूर लाइक्स मिळाले, पण दुसऱ्या फोटोला कमी लाइक्स मिळाले तर ही मंडळी लगेच निराशही होतात. मग अजून त्यांच्यापेक्षा चांगला, वेगळा फोटो आपण कसा काढू शकतो याचाच ते विचार करायला लागतात. मग रिस्क घेऊन सेल्फी काढायचे प्रकार सुरू होतात. मग अपघातही होऊ शकतात.
सेल्फीचं हे विश्व खोटं असतं. ते केवळ स्वतःला खूश करण्यासाठी असतं. त्यात जास्त गुंतून राहायचं नाही हे आजच्या तरूणांना कळलं पाहिजे. ही एक प्रकारची विकृती आहे हे पालकांनी त्यांना ते पटवून दिले पाहिजे. सेल्फीमुळे आत्मविश्वास वाढतो हे खरं असलं तरी तो क्षणिक असतो. कायम टिकणारा नसतो.
हे वेड टाळायचे तर…
- सेल्फी जास्त काढत राहिल्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होते हे लोकांना कळत नाही.
- सेल्फीची सवय असलेल्यांनी समुपदेशन घ्यायची गरज आहे. नाहीतर मनोविकार तज्ञांना भेटून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.
- आपला आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे. तो कसा वाढेल ते पाहिले पाहिजे.
- एखाद्या विधायक कामात स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे.
- एकटे राहूच नका. एकटेपणामुळे सेल्फी जास्त काढले जातात. मित्रमैत्रीणींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
- सोशल मिडीयाचा कमीतकमी आणि गरजेपुरताच वापर करायचा हे आपण मनाशी ठरवून घेतलं पाहिजे.
- चिंता, नैराश्य वगैरे असेल तर त्याबाबत योग्य उपचार करवून घेतले पाहिजेत.
- दुसऱयांशी आपली सतत तुलना न करणे हाही सेल्फीना आळा घालण्याचा एक उपाय आहे. या तुलना आरोग्यदायी नाहीत.
सेल्फीचे असेही फायदे
- काहीजण आत्मकेंद्री असतात. पण छान सेल्फीमुळे त्यांची वाहवा होते. अशा लोकांचा आत्मविश्वास वाढायला सेल्फींची खूप चांगली मदत होते.
- महान वा प्रसिद्ध व्यक्ती भेटल्यावर तो सुंदर क्षण सेल्फीद्वारे टिकवून ठेवता येतो.
लेखक मनोविकार तज्ज्ञ आहेत.




























































