आता उपांत्य फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस, पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये होणार बदल

1459

इंग्लंडच्या क्रिकेट संघाला सर्वाधिक चौकारांच्या आधारावर वन डे वर्ल्ड कप जेता ठरवण्यात आले. त्यानंतर पावसामुळे लढत रद्द करण्यात आल्यानंतर एकही चेंडू न टाकता इंग्लंडच्या महिला संघाला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता पकडावा लागला. यापुढे अशा गोष्टी घडू नयेत यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आयसीसीसमोर एक प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस ठेवण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20 वर्ल्ड कप दरम्यान उपांत्य फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नसल्यामुळे इंग्लंडच्या संघाला याचा फटका बसला. पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू न टाकता हिंदुस्थानविरुद्धची उपांत्य लढत रद्द करण्यात आली आणि इंग्लंडचा संघ बाहेर फेकला गेला. हिंदुस्थानी संघाने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे त्यांना पुढे चाल देण्यात आली. आयसीसीच्या या नियमावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली. त्यामुळे आता आगामी पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपमधील बाद फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस ठेवण्यात यावा अशी मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आयसीसीकडे करण्यात येणार आहे.

पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असून 18 ऑक्टोबरला या स्पर्धेची सुरूवात होणार आहे. 15 नोव्हेंबरला मेलबर्न येथे या स्पर्धेच्या जेतेपदाचा पैसला होईल. सध्या तरी अंतिम फेरीसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, पण स्पर्धेची आयोजन समिती आयसीसी पदाधिकाऱयांसोबत येत्या जून-जुलैदरम्यान याबाबत चर्चा करणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या