वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षण; ऑनलाइन नोंदणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

12 आणि 24 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करणाऱया शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 23 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या वेबसाईटवर प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येणार आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी सेवेचा 12 वर्षे आणि 24 वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे शिक्षक या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहेत. ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचण आल्यास शिक्षकांनी [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह यांनी केले आहे.

सशुल्क सेवांतर्गत प्रशिक्षणास विरोध

राज्यातील सेवेतील शिक्षकांसाठी तीन वर्षांनंतर सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असल्याने कित्येक शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी मिळण्यातील अडचण दूर झाली आहे. राज्यात सुमारे दहा हजार शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ व निवड श्रेणीपासून वंचित राहिले आहेत. या वेळी प्रथमच या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्वीप्रमाणेच विनाशुल्क देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली असून शासनाने हे प्रशिक्षण विनाशुल्क देण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये शालार्थ आयडीची नोंद करणे सक्तीचे असल्यामुळे विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंशासित, शाखेतील शिक्षकांना प्रशिक्षण घेता येणार नाही. त्यामुळे शालार्थ आयडीची सक्ती रद्द करण्यात यावी, असेही संघटनेच्या वतीने समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.