सेरेनाच्या स्वप्नांना सुरुंग, व्हिक्टोरिया अझारेन्का अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

24व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला गवसणी घालत मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या सेरेना विल्यम्सच्या स्वप्नांना शुक्रवारी सुरुंग लागला. दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने सेरेना विल्यम्सचे कडवे आव्हान 1-6, 6-3, 6-3 अशा तीन सेटमध्ये परतवून लावले आणि तिसऱयांदा अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅममधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता तिच्यासमोर जेतेपदाच्या लढतीत जपानच्या नाओमी ओसाका हिचे आव्हान असणार आहे. सेरेना विल्यम्सला 24व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासाठी फ्रेंच ओपन स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे.

मानसिकदृष्टय़ा सक्षम असल्यामुळेच विजय मिळाला
सेरेना विल्यम्ससारख्या दिग्गज खेळाडूविरोधात मानसिकदृष्टय़ा सक्षम असणे गरजेचे होते. या विजयात हीच कणखरता कामी आली. पहिल्या सेटमध्ये तिने मला बॅकफूटवर ढकलले होते. पण मानसिकरीत्या सक्षम असल्यामुळे मला पुढील दोन सेटमध्ये चांगला खेळ करून झोकात पुनरागमन करता आले, असे व्हिक्टोरिया अझारेन्का यावेळी म्हणाली.

दुसऱयांदा अंतिम फेरीत
जपानच्या नाओमी ओसाका हिने उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीला 7-6, 3-6, 6-3 असे हरवत दुसऱयांदा अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत मजल मारलीय. याआधी तिने 2018 साली ही स्पर्धा जिंकण्याची करामत केली होती.

मेट, ब्रुनो पुरुष दुहेरी गटात चॅम्पियन
क्रोएशियाचा मेट पॅविच व ब्राझीलचा ब्रुनो सोरेझ या जोडीने पुरुष दुहेरी गटात चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. दोघांनी फायनलमध्ये नेदरलॅण्डचा वेस्ली कूलहोफ व क्रोएशियाचा निकोला मेकटीच या जोडीवर 7-5, 6-3 अशा फरकाने विजय मिळवत झळाळता करंडक पटकावला.