सात हजार किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या कायद्याची पुणे महापालिकेने जोरात अंमलबजावणी केली आहे. शहरात दिवसभरात तब्बल ७ हजार ४२ किलोच्या प्लॅस्टिक पिशव्या, तर ५० किलो थर्माकोल जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने १७० जणांची १७ पथके तयार केली होती. त्याशिवाय सरकारची दोन पथके होती. या पथकांनी दुसऱ्या दिवशी कारवाई केली. त्यात किराणा दुकानदार, बेकरीचालक, कपडे व्यावसायिक यांचा समावेश होता. शहरात दिवसभरात तब्बल ७ हजार किलोच्या प्लॅस्टिक पिशव्या, तर ५० किलो थर्माकोल जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी दिली.

महापालिका जनजागृती करणार
राज्यशासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर केलेला आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी दंडाच्या पावत्या केल्या असल्याच्या तक्रारी आल्या असल्यामुळे यादिवशी दंड आकारू नये, अशा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेचा कोणाता कर्मचारी सुट्टीच्या दिवशी दंडाची आकारणी करत असल्यास त्याची माहिती घनकचरा विभागाला कळवावी, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. महापालिका नागरिकांच्या जनजागृतीवर भर देणार आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १८२ कोठी कार्यालय यांच्याकडून प्लॅस्टिक स्वीकारले जाईल. पॅकेजिंग पदार्थाबाबत सध्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही उपाययोजना सुचविण्यात येत असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले.

कचराकुंड्यांच्या जागी प्लॅस्टिकच्या कचऱ्यांचा खच
रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या कचराकुंड्यांच्या जागी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा खच पडला आहे. नागरिक येथे उशिरा प्लॅस्टिक पिशव्या कचराकुंडीत टाकतात. त्यामुळे कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या प्रमाणाची लक्षणीय वाढ झाली आहे.