
सामना प्रतिनिधी । अलिबाग
तरूणीस धमकावून तिच्याशी चार ते पाच वेळा जबरदस्तीने शारीरीक संभोग करणार्या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 80 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, महाड तालुक्यातील खर्डी येथे राहणारा रोहित उर्फ गोम्या रामचंद्र महाडीक याने पीडित तरूणीला ती दुसर्या मुलाबरोबर फिरते हे तिच्या आई-वडिलांना सांगण्याचे धमकी देऊन तिच्याशी चार ते पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यात पीडित महिला सहा महिन्याची गर्भवती राहिली.
याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 376, 376 (2) (एन), 452, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एम. तोडकरी, पोलीस निरीक्षक मा.शा. पाटील यांनी केला. आरोपी विरूद्ध माणगाव न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात सरकारी वकिल अमित देशमुख यांनी प्रभावीपणे युक्तीवाद करून आरोपीचा गुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. सर्व साक्षी पुरावे आरोपी रोहित उर्फ गोम्या महाडीक याच्या विरोधात सिद्ध झाल्याने न्या. टि.एम. जहागिरदार यांनी त्यास 7 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंड तसेच 506 अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


























































