जोगेश्वरी येथील सेक्स रॅकेटचा, पर्दाफाश; पाच तरुणींची केली सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

जोगेश्वरी येथे स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा क्राइम ब्रँच युनिट-10 ने पर्दाफाश केला. पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक करून पाच तरुणींची सुटका केली. त्या दोघांना पुढील कारवाईसाठी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले. जोगेश्वरी येथे एका निवासी इमारतीत सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती युनिट-10 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी याना मिळाली. त्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लोंढे, सांडभोर, माने, चौरे, खरात, सोनावणे, गायकवाड आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने दलालाला संपर्क केला. संपर्क केल्यानंतर काही तरुणींची मागणी केली तेव्हा त्याला लिंक रोड येथील एका सोसायटीमध्ये बोलवण्यात आले.

ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहक त्या फ्लॅटमध्ये गेला. पैशाचा व्यवहार सुरू असतानाच युनिट-10 च्या पथकाने छापा टाकून प्रीती गाडे आणि राकेश शर्मा या दोघांना ताब्यात घेऊन पाच तरुणींची सुटका केली. त्या पाच तरुणींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. पीडित तरुणी या एका स्पामध्ये काम करत होत्या. स्पाच्या नावाखाली त्या तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये ओढले जात होते. सेक्स रॅकेटप्रकरणी प्रीती आणि राकेशला अटक करून ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रीतीविरोधात अशाच प्रकारचा एक गुन्हा चारकोप पोलीस ठाण्यात दाखल आहे.