#Article370 युएन झोपले काय? कलम 370 रद्द झाल्यावर आफ्रिदीचा तीळपापड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोमवारचा दिवस हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक ठरला. राज्यसभेमध्ये जम्मू-कश्मीरचे विभाजन करणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत हा प्रस्ताव मांडला होता. दीर्घ चर्चेनंतर आवाजी मतदानाने 125 विरुद्ध 61 अशा मताने कलम 370 रद्द करण्यात आले. कलम 370 रद्द करण्यात आल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. तेथील नेत्यांसह माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने थेट युएनवर बोट उचलले आहे.

जम्मू-कश्मीरचे विभाजन करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रामध्ये जायच्या तयारीत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी या मुद्द्यावर बरळला आहे. ‘संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार कश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजे. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? कश्मीरमध्ये होत असलेले आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे, असे ट्वीट आफ्रिदीने केले आहे.