।। श्री शंकरगाथा ।।

155

पूर्वपीठिका

‘हिंदुस्थान’ ही विविध देवदेवता आणि थोर ऋषिमुनींच्या वास्तव्याने पावन झालेली ‘पुण्य’भूमी आहे. या हिंदुराष्ट्रामध्ये अनेक प्रांत आहेत. या प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे आगळेवेगळे भौगोलिक वैशिष्टय़ आहे, व्यक्तित्व आहे, संस्कृती आहे आणि रीतिरिवाजही आहेत. त्याशिवाय या प्रत्येक प्रांताला अनेकविध देवदेवता, संतमहंत, सिद्धसत्पुरुष आणि संप्रदायांची पार्श्वभूमीदेखील लाभलेली आहे.

याला हिंदुस्थानातील ‘महाराष्ट्र’प्रांत देखील अपवाद नाही. महाराष्ट्राच्या ‘पुण्य’भूमीवर आजपावेतो अनेक देवदेवता, थोर ऋषिमुनी, प्रसिद्ध संतमहंत आणि श्रेष्ठतम सिद्धसत्पुरुषांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य झाले. पुराणकथांमधून तसेच लोकसंचितामधून त्यांचे अवतारकार्य आणि कर्तृत्व समस्त भारतवर्षाला सुपरिचित व्हावे असे त्यांचे प्रत्येकाचे अलौकिक महिमान आहे. महाराष्ट्रातील अध्यात्ममार्ग विविध संप्रदायांच्या माध्यमातून वृद्धिंगत झाला आणि त्यातूनच कर्म, भक्ती, ज्ञान आणि योगमार्गाद्वारे मराठमोळ्या अध्यात्माचा ‘वेलू’ जोरकसपणे बहरास आला. अनेक संतश्रेष्ठ आणि असामान्य सिद्धसत्पुरुषांनी रुजविलेल्या अनेकविध संप्रदायांमधून या महाराष्ट्रभूमीवर, अध्यात्माचे प्रसन्न व प्रासादिक ‘शिंपण’ घातले गेले आणि यापुढेदेखील ही परंपरा जोमाने चालू राहील यात ‘शंका’ नाही.

महाराष्ट्राच्या पुण्यभूमीचे ‘पावित्र्य’ आणि ‘महत्त्व’ त्रिखंडामध्ये दुमदुमविणाऱया विविध संप्रदायांमध्ये प्रामुख्याने ‘वारकरी’ संप्रदाय, ‘दत्त’ संप्रदाय तसेच ‘नाथ’ संप्रदायाचा समावेश होतो. ‘वारकरी, दत्त व नाथ’ संप्रदायाने अध्यात्मविश्वाला अगणित अलौकिक सत्पुरुष दिलेले आहेत. महाराष्ट्रभूमीला संत ज्ञानेश्वर ते स्वामी स्वरूपानंद, श्रीपादश्रीवल्लभ ते श्रीचिले महाराज आणि श्रीमच्छिंद्रनाथ ते श्रीसाईनाथ अशी प्रदीर्घ आणि दिव्य सांप्रदायिक परंपरा लाभलेली आहे. या परंपरेमध्ये, ज्या संतसत्पुरुषांच्या अवतारकार्यावर प्रत्येक संप्रदायाची ‘छटा’ आणि ‘ठसा’ ठळकपणे उमटल्याचे दिसून येते त्या संताच्या मांदियाळीत ‘श्रीशंकर महाराज’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

‘मै कैलास का रेहनेवाला, मेरा नाम है शंकर’ अशी स्वतःची ओळख करून देणारे श्रीशंकर महाराज हे अध्यात्ममार्गातील अद्भुत, आणि अलौकिक सिद्धसत्पुरुषांपैकी एक असून अलीकडच्या काळातील प्रमुख श्रीगुरूअवतार आहेत. ‘यह दुनिया में कई रंग है । यह रंग निराला है’ ही त्यांच्या दिव्य व्यक्तित्वाची खरी ‘ओळख’ आहे आणि हेच त्यांच्या अवतारकार्याचे ‘वैशिष्टय़’देखील आहे.

ऋषीचे ‘कूळ’ आणि नदीचे ‘मूळ’ शोधण्याचा प्रयत्न करू नये असे पूर्वापार प्रचलित असलेले एक महत्त्वपूर्ण ‘सत्य’वचन आहे. त्यास अनुसरूनदेखील अनेकदा, काही चिकित्सक संशोधक मंडळी विविध संप्रदायातील अनेकविध सिद्धसत्पुरुषांचे ‘कूळ’ अन् ‘मूळ’ शोधण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांमध्ये काहींना यश मिळते तर काहींच्या हाती अपयश येते. अथक प्रयत्नांती आणि चिकाटीने शोध घेतल्यानंतरही कित्येक सिद्धसत्पुरुषांचे ‘कूळ’ आणि ‘मूळ’ शोधणे अवघड होऊन बसते आणि त्यांच्या पूर्वायुष्याचा थांगदेखील कुणास लागू शकत नाही. धनकवडी येथे समाधिस्थ झालेले श्रीशंकर महाराज या सर्वांच्याही पलीकडे आहेत.

महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि जगभरातील काही प्रमुख शहरांमध्ये, श्रीशंकर महाराज यांची ‘ओळख’ व त्यांचे चिरपरिचित ‘अस्तित्व’, त्यांच्या सहवासात आलेल्या भक्तांच्या स्वानुभविक आठवणींतून अनेकदा उघड झालेले आहे. मात्र, श्रीशंकर महाराजांचे मूळ नाव, गाव, त्यांचे मातापिता, तसेच त्यांचे पूर्वायुष्य आजदेखील अनेकांसाठी अत्यंत ‘गूढ’ आणि तितकेच ‘अनाकलनीय’ आहे.

जन्म, बालपण, चरित्रकार्य आणि अवतारसमाप्ती या चारही गोष्टींशी निगडित प्रचीती आणि अनुभूतींच्याद्वारे सर्वसामान्य भक्तांचे लक्ष वेधून घेणारे दिव्य अलौकिक गुरुतत्त्व श्रीशंकर महाराजांना लाभलेले आहे म्हणूनच, त्यांचे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्त्वाचे ‘वैशिष्टय़’ जाणून घेण्याचा प्रयत्न या दैनंदिन लेखमालेच्या माध्यमातून केला जाणार आहे.।।श्रीस्वामीसमर्थ… जय शंकर।।

चैतन्यस्वरूप ([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या