शरद पवार ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, उद्या शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पोटात दुखू लागल्याने रविवारी ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पवार यांच्या प्रकृतीविषयीची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. दोन दिवसांसाठी पवार घेत असणारी रक्त पातळ करणारी औषधे थांबवण्यात आली आहेत. 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांसह अन्य विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत. ‘माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दीदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दीदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्यासोबत आहेत. त्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे,’ असेही पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आस्थेवाईकपणे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यासंदर्भात पवारांनी ट्विट केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनःपूर्वक आभार!,’ असे पवारांनी म्हटले आहे.