पंतप्रधानांनी विरोधकांचा मान राखायला हवा! 82व्या वाढदिवशी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेता यासुद्धा लोकशाहीच्या संस्था आहेत. त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. स्वातंत्र्यलढय़ानंतरच्या पंतप्रधानांनी ते पाळले. परंतु आता पाळले जात नाही. पंतप्रधानांनी विरोधकांचा मान राखायला हवा.’, अशा शब्दांत आपल्या 82 व्या वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले.

शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला. यावेळी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राज्यभरातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘पंडित जवाहरलाल नेहरूंपासून त्यानंतरच्या अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम मी पाहिले. त्यांची भाषणे ऐकली. निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतर तिथे विरोधी पक्षाची सरकारे असली तरी नेहरूंनी कधी विरोधकांवर टीका केली नाही.’ नागपूर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मोठय़ा प्रमाणावर विरोधकांवर टीका केली होती. त्याची आठवण करून देतानाच शरद पवार यावेळी म्हणाले की, ’पक्षाच्या वतीने जाहीर सभा किंवा निवडणूक प्रचाराला गेल्यानंतर विरोधकांवर टीका टिप्पणी करण्याचा शंभर टक्के अधिकार आहे. पण रेल्वे, रस्ते, रुग्णालये आणि सरकारी कार्यक्रमांचे उद्घाटन करताना व्यासपीठावर विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचे आहे.’ असा सवाल पवार यांनी केला.

समृध्दी महामार्गाबद्दलची एक आठवणही शरद पवार यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, ‘संभाजीनगरला शेतकऱयांच्या एका शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. समृद्धीr महामार्गासाठी जमिनी घेतल्या जाताहेत पण त्याची रास्त किंमत दिली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पह्न केला होता. विकासाला विरोध नाही पण या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांच्या उत्पन्नाचे ते साधन असल्याने त्यांना रास्त किंमत द्या, असे मी सुचवले होते.’

‘लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. ते समाजहिताचे नसेल तर त्याच पध्दतीची भूमिका घ्यायची असते. राज्यकर्त्यांनीसुद्धा देशातील प्रांतांकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे.’ असे शरद पवार यांनी सुनावले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, कॉंग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर, शिवसेना आमदार मनिषा कायंदे आदी मान्यवर आणि पदाधिकाऱयांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.

राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया

‘माझी वयाची 82 वर्षे पूर्ण झाली आणि 83 व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण का करुन देता अशी मिश्किल टिपण्णी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार यांनी केली. आपण एकसंघ राहून राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे – जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहूया आणि देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया!’ असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीच्या डीएनएमध्ये – जयंत पाटील

‘महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे होते. फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम त्या सरकारने केले आणि हाच विचार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डीएनएमध्ये आहे.’, असे याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राला 50 वर्षे पुढे नेण्याचे काम शरद पवार यांनी केले – अजित पवार

‘महाराष्ट्राला 50 वर्षे पुढे नेण्याचे काम शरद पवार यांनी केले अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याच्या आर्थिक विकासात शरद पवार यांनी महत्वाची भूमिकाही बजावली.’, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचा कांगावा

‘शाईफेकीचे समर्थन मी कधीच करणार नाही. उच्च शिक्षणमंत्र्यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, भाऊराव पाटील यांच्याबाबत बोलताना भीक मागणे हा शब्द वापरला नसता तर असे घडले नसते. परंतु लगेच त्यांनी गिरणी कामगारांचा मुलगा आहे असे म्हणून दाखवले. सामान्य कुटुंबातील व्यक्ती सत्तेपर्यंत पोहोचलेले उदाहरण तुमचेच आहे का? कितीतरी लोक असे आहेत. त्यांच्यावर टीकाटिपण्णी झाली, परंतु त्यांनी असा कांगावा कधी केला नाही’, असे शरद पवार यावेळी म्हणाले.