
रिपाईचे अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एनडीए’सोबत यावे अशी ऑफर दिली होती. आठवले यांच्या ऑफरवर बोलताना शरद पवार म्हणाले, आठवलेंचा एक आमदार किंवा खासदार तरी निवडून आलेला आहे का. त्यामुळे त्यांचे विधान फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संसदेत सुद्धा त्यांच्या वक्तव्याला कोणी गांभीर्याने घेत नाही, असा टोला पवारांनी लगावला.
मंगळवारी शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर होते. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज जाधव यांचे नुकतेच निधन झाल्याने पवार यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी पंढरपूरला आले होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.
दोन्ही छत्रपतींनी पुढाकार घ्यावा
मराठा समाजाचे नेतृत्व करणारे दोन्ही छत्रपती हे भाजपाचे खासदार आहे. या खासदारांची केंद्रात सत्ता असल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायला त्यांची मदत होईल. त्यामुळे दोन्ही छत्रपतींनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
रस्त्यावर उतरायचे की कोर्टात जायचे लवकरच निर्णय
केंद्राच्या कृषी धोरणाविषयी बोलते केले असता पवार म्हणाले, या कृषी धोरणातील काही गोष्टी आम्हाला मान्य नाहीत त्यावर नेमकी काय भूमिका घ्यायची यावर चर्चा सुरु आहे. या विषयावर आंदोलन करताना ते देशव्यापी असावे अशी आपली भूमिका आहे. त्यावर लवकरच निर्णय घेऊन कोर्टात जायचे का रस्त्यावर उतरायचे याचा निर्णय होईल




























































