#Article370 जनता व विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं! – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्यासंदर्भात विधेयक मांडले. यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण असून विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कश्मीरची संस्कृती वेगळी असून तेथील बहुतांश जनता देशाशी निष्ठा बाळगणारी आहे. जम्मू-कश्मीरबाबत इतका महत्त्वाचा निर्णय घेताना तेथील जनतेला व विरोधकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर अधिक चांगले झाले असते, असे शरद पवार म्हणाले. एकामागोमाग एक ट्वीट करून त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले आहे.

जम्मू काश्मीरमधील लोकांना, विशेषत: तरुणांना हा निर्णय पटवून देण्यासाठी आणि खोऱ्यात शांतता व शांती असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले पाहिजे. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून हे शक्य असल्याचे शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले. तसेच 1947 मध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी कश्मीरची सांस्कृतिक अस्मिता टिकवून ठेवण्याचे आश्वासन दिल्यावर महाराजा हरीसिंग यांनी कश्मीरला हिंदुस्थानमध्ये समाविष्ट केले होते, याची आठवण पवार यांनी आपल्या ट्वीटमधून करून दिली.