
सतत घरात सतत त्रास देतो म्हणून वडील, भाऊ आणि मुलगा यांनी संगनमत करून तरुणाला काठीने हातावर, पायावर मारून हात पाय मोडून त्याचा खून केला. त्यानंतर कुठलाही अंत्यविधीनंतरचा विधी पार न पाडता लाकडी सरणावर ठेवून पेटवून देवून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शिरनेर येथे 16 मे रोजी उघडकीस आला आहे.
धर्मराज नारायण वैद्य असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका व्यक्तीस जिवानिशी मारून त्याला जाळून टाकले जात आहे, अशी माहिती अंबड पोलिसांना गुप्त खबर्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली आणि घटनास्थळी पोहचले. 15 मे, सोमवार रोजी शिरनेर ता. अंबड जि. जालना येथील नारायण वैद्य यांच्या शेतात त्यांचा मुलगा धर्मराज वैद्य हा नेहमी घरी वादविवाद करून त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून धर्मराज याचे वडील, भाऊ आणि मुलगा या तिघांनी मिळून धर्मराज याला जिवे मारून टाकले.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे प्रेत जाळून टाकले. वडील नारायण चिमाजी वैद्य, भाऊ कर्णराज नारायण वैद्य, मुलगा निर्गुण धर्मराज वैद्य सर्व रा. शिरनेर ता. अंबड जि. जालना यांनी संगनमत करून धनराजला शेतात नेऊन त्याला काठीने मारहाण केली. यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्याचा खून केला. त्यानंतर धर्मराजचे प्रेत जाळून तिघांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला असता तिन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मॉरिओ बर्नाट स्कॉट यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात कलम 302, 201, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हुंबे हे करीत आहेत.
घटनेची माहिती कळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. स्कॉट,सहायक पोलीस निरीक्षक साजीद अहमद, पो.हे.कॉ. विष्णू चव्हाण,संतोष वनवे, सतिश देशमुख, प्रताप चव्हाण, वंदन पवार, देवधन राजपूत आदींनी कारवाई केली.


























































