आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेमुळे जळगावात शिवसैनिकांमध्ये उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray

सामना प्रतिनिधी । जळगाव

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी ‘जन आशीर्वाद’ यात्रेचा भव्यदिव्य शुभारंभ उद्या 18 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यातुन होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जळगाव जिल्हा व खान्देशमध्ये भगवे चैतन्य व उत्साह पसरला आहे. जळगाव ग्रामीण -धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा व अमळनेर या पाच विधानसभा क्षेत्रात जन आशीर्वादयात्रा जाणार असून आदित्य ठाकरे हे संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत व ज्यांनी मत दिले नाहीत, त्यांची मने जिंकायची आहेत असा विश्वास व्यक्त करत आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ उद्यापासून धडाक्यात सुरू होणार आहे. मुंबई येथून विमानाने 18 जुलै रोजी आदित्य ठाकरे यांचे जळगावात आगमन होणार आहे. त्यानंतर जळगावच्या विसनजीनगरातील प्रसिध्द गणपती मंदिरात आदित्य ठाकरे हे पुजा करून मार्गस्थ होणार आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिरसोली येथे वृक्षारोपण व स्वागत झाल्यावर सकाळी 11 वाजता पाचोरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक लक्ष्मीनगर याठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भडगाव, कासोदा, एरंडोल येथे संवाद झाल्यावर धरणगाव येथील इंदिरा गांधी हायस्कुल जवळील मैदानात विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम झाल्यावर चोपडा येथे जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. अमळनेर येथील पैलाड भागातील चोपडा चौकाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक असे नामकरण करण्यात येणार असtन फलकाचे अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी आदित्य ठाकरे हे समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख विलास पारकर व संजय सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत व विलास पारकर, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, कैलास पाटील, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, जिल्हा युवाअधिकारी शिवराज पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक करत आहेत.