शहराचा शाश्‍वत विकास शिवसेनाच करु शकतेः अनिल राठोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहराचा शाश्‍वत विकास ही शिवसेनाच करु शकते, जनतेचा विश्‍वास हा शिवसेनेवर आहे. तसेच दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शहरामधून जाताना येताना भीती वाटते असे त्यांनी वक्तव्य केले. मग तसे असेल तर येथील जनताही किती भयभीत आहे हे यावरुन सिध्द झाले आहे. उड्डाणपुलाच्या संदर्भात केलेले वक्तव्य निराळेच असल्याचा टोला शिवसनेचे उपनेते अनिल राठोड यांनी लगावला आहे. शहराच्या विविध प्रश्‍नांच्या संदर्भात विविध विषय मांडून उपनेते राठोड यांनी शहरासंदर्भातील मत व्यक्त करुन विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

राठोड म्हणाले की, भाजप समवेत आम्ही होतो, मात्र येथील भाजप ही राष्ट्रवादी व काँग्रेस प्रणित झाली आहे, म्हणून शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मात्र, जे लोक आमच्या बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत. नगरची जनता अतिशय सुज्ञ आहे. येथील जनतेला शिवसेनेवर मोठा विश्‍वास आहे. शिवसेनेच्या धुनष्यबाणावरच ती मतदान करते कारण त्यांचा विश्‍वास फक्त शिवसेनेवर आहे. गेल्या 20 -25 वर्षात शिवसेनेने जो विकास केला आहे तो महत्त्वाचा असून जनतेला हे माहित आहे, निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही या निवडणूकीमध्ये चारित्रवान, स्वच्छ प्रतिमेचे उच्च शिक्षीत, म्हणजेच इंजिनिअर, डॉक्टर असे चांगले उमेदवार तसेच सामाजिक कार्याची जाण असणारे उमेदवार दिले आहे. चांगले लोक महानगर पालीकेवर निवडून आले पाहिजेत, हा मुख्य उद्देश आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेवून आम्ही वाटचाल करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्या मना मनामध्ये आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेला नारा आम्हाला पूर्ण करायचा आहे.

शिवसेनेची सत्ता असताना आम्ही मॉडेल रस्ते केले, लोकांचा पैसा डांबरात जावू नये हीच आमची भूमिका आहे. शास्वत विकास झाला पाहिजे. शहरासाठी दोन पाणीपुरवठा योजना आम्ही आणल्या. अमृत योजना व भुयारी गटार योजना यांचा त्यात समावेश आहे. त्या कार्यान्वीत झाल्यावर शहराचा 40 वर्षांचा प्रश्‍न सुटणार असून रात्रीचे पाणी अवेळी देणे बंद करणार असून दिवसा व मुबलक पाणी देण्याचा आमचानिर्धार आहे, असे उपनेते राठोड म्हणाले.

उड्डाणपुलासंदर्भात अनेकवेळा नारळे फुटली अनेक घोषणा झाल्या. पण खासदार दिलीप गांधी यांनी केलेले आरोप पाहिल्यावर आपल्याला हसूच येते. प्रस्ताव व्यवस्थित केला नाही, असे ते म्हणाले. बहुधा त्यांना ज्ञान कमी असावे कारण मनपाने 15 कोटी रुपये त्यासाठी काढून ठेवले आहे, मात्र त्यांची विकास करण्याची तयारीच नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहरातून जाताना मला जीव मुठीत धरुन जावे लागते, अशी टिका केली. जर मंत्री व नेत्यांची अशी अवस्था असेल तर येथील जनता किती भयभीत आणि कोणत्या परिस्थितीत वावरत आहे. हे तुम्ही पाहिले पाहिजे. नगरची प्रतिमा गेल्या 4 वर्षामध्ये देशात खराब झाली आहे. नगरचे लोक कोठे गेले तर लोक त्यांच्याकडे भीतीने पाहतात. दोन खून पडले. एसपी कार्यालय फोडले गेले आहे. मात्र, आता शिवसेनेला शहराचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करायचे आहे. येथील बाजारपेठा फुलवायच्या आहेत. युवकांच्या हाताला काम मिळावे या हेतून एमआयडसी विकसीत करायची आहे. पर्यटन केंद्र वाढावे म्हणून आम्ही मनपाच्या पिंपगळाव माळवी तलावाला साडे सहाशे एकर जागेला मनपाचे नांव लावून घेतले. ते केवळ शिवसेनेमुळेच झाले. याच हेतूने लोक शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.