महानगरपालिका निवडणूक : भाजपकडून आचारसंहिता भंग, शिवसेनेची आयोगाकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सुरू असताना भाजपाकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे. याबाबतची तक्रार गुरुवारी राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.

देशभरातील नागरिकांना पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरित करण्याचा महत्त्वाकांक्षी योजनेचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण प्रकल्प उभारणीचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये नगर शहराचा समावेश आहे .केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम हा वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एक प्रकारे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा हा एक प्रकार असून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवेदनाद्वारे केली आहे.

देशामध्ये पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराच्या गॅसचा प्रकल्प सुरु करणार असून त्याचे दिल्ली येथून उद्घाटन करण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दोन दिवसापूर्वीच या कार्यक्रमाची घोषणा केली होती. वास्तविक पाहता नगर महानगरपालिकेची निवडणुक असतानाही या योजनेमध्ये नगर शहराचा समावेश केल्यामुळे एक प्रकारे तो अचारसंहितेचा भंग ठरणार आहे. आता निवडणुक आयोग या संदर्भात निर्णय काय घेते याकडे लक्ष लागले आहे.