लोअर परळ ब्रिजच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूककोंडीवर पर्याय काढा! शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोअर परळ येथील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामामुळे वरळी येथील ई मोझेस रोड तसेच ऍनी बेझंट रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे. यासाठी सेंट्रल रेल्वे, आंबेडकर मार्ग अशी कनेक्टिव्हिटी देण्यात यावी. यासाठी विकास आराखड्यात तरतूद करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

लोअर परळ रेल्वे ब्रिज नादुरुस्त झाल्याने तो दुरुस्तीच्या कारणासाठी बंद आहे. दुसऱ्याबाजूला वरळीमध्ये डॉ. ऍनी बेझंट रोड व एलबीएस रोड मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झालेले आहेत. यामुळे ट्रफिकची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रेल्वे ब्रिजचे काम सुरू होणार आहे. काही दिवसांनी करीरोडचा ब्रिजदेखील दुरुस्तीसाठी काढावा लागेल. त्याचप्रमाणे प्रभादेवी येथील रेल्वे ब्रिजही दुरुस्तीसाठी काढावा लागेल. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सेंट्रल रेल्वे, आंबेडकर मार्ग अशी कनेक्टिव्हिटी देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाने दिला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार याची नोंद डीपीमध्ये असायला हवी. तेव्हा याची नोंद डीपीमध्ये करून घेण्यासाठी सरकारने नगरविकास खात्याला आदेश द्यावेत, अशी मागणी सुनील शिंदे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे विधानसभेत केली.