
शेतीच्या हंगामात पावसाळ्यात मशागत करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यातील जावळी मुगवली येथील शेतकऱ्यांना तसेच गोरेगाव ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
दक्षिण रायगड जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम तसेच संपर्क मोहीम जोरात सुरू आहे. गावखेड्यांतील ज्येष्ठ-निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान केला जात असतानाच शेतकरी, कामकऱ्यांशी संपर्क आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत.
माणगाव तालुक्यातील जावळी मुगवली या गावात संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या संकल्पनेतून व जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम पोहोचली आणि उपजिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे, विभागप्रमुख राजू पालकर व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले. भरपावसात सेवा बजावणाऱ्या गोरेगाव ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांनाही शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संघटक डॉ. स्वीटी गिरासे यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.




























































